जीएसटी विषयक पत्रकार परिषदेत अजीत चव्हाण यांचा संतापजनक पवित्रा
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I केंद्र सरकारने अलीकडेच वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) विविध स्लॅबमध्ये बदल केले असून त्याचा सर्वसामान्य जनतेला काय फायदा होणार आहे, याची माहिती देण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने जळगावात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. मात्र या परिषदेदरम्यान पक्षाचे सह-मुख्य प्रवक्ते अजीत चव्हाण यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना आक्रमक होत शब्दांचा भडीमार केल्याने वातावरण तापले.
पत्रकारांनी परिषदेत जीएसटीसंदर्भात प्रश्न विचारल्यावर चव्हाण अचानक भडकले. “असं पत्रकार माझ्यावर जबरदस्ती नाही करायचं, मला जे सांगायचं ते मी करेन. पत्रकार मला कसकाय प्रश्न विचारतील, मी कसकाय प्रतिप्रश्न करणार... पत्रकार परिषद असते, मी पण संपादक होतो, हे तुम्ही मला सांगायचं नाही. पत्रकार परिषद अशी नसते की पत्रकारांनी काही प्रश्न मला विचारायचे,” अशा शब्दांत त्यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली.
या संतापजनक वक्तव्यांमुळे उपस्थित माध्यम प्रतिनिधींमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. इलेक्ट्रॉनिक, प्रिंट व डिजिटल सर्व माध्यमांचे पत्रकार यावेळी उपस्थित होते. पत्रकार परिषदेत अचानक निर्माण झालेल्या या तणावपूर्ण परिस्थितीमुळे भाजपच्या परिषदेचा मूळ उद्देश मात्र मागे पडल्याचे चित्र दिसून आले.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. मात्र संपूर्ण परिषदेचे केंद्रबिंदू प्रवक्त्यांचा पत्रकारांवर केलेला शब्दवार ठरला.
टिप्पणी पोस्ट करा