Top News

भरधाव वाहनाच्या धडकेत १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू; सुप्रीम कॉलनी चौकातील घटना

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील सुप्रीम कॉलनी चौकामध्ये आज मंगळवार रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास भरधाव अज्ञात वाहनाने दिलेल्या जबर धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. या अपघाताने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत तरुणाची ओळख प्रेम उर्फ जयपाल चरणसिंग पाटील (वय १८, रा. लोंढरी, ता. जामनेर, हल्ली मुक्काम एमआयडीसी परिसर, जळगाव) अशी झाली आहे. जयपाल नुकताच बारावीचा अभ्यास पूर्ण करून पुढील शिक्षणाची तयारी करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपाल हा मंगळवार सकाळी एमआयडीसी भागातून दुचाकीवरून मावशीच्या घरी जात असताना सुप्रीम कॉलनी चौकामध्ये अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत तो गंभीर जखमी झाला. तातडीने त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

जयपाल याच्या पश्चात आई, वडील आणि बहिण असा परिवार आहे. त्याचे वडील चरणसिंग पाटील हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी भागात कामगार म्हणून कार्यरत आहेत. मुलाच्या अचानक झालेल्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने