चौकशी तर नाहीच, पण पोलिस व आमदारही माध्यमांपासून दूर
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पोलीस निरीक्षक संदीप पाटील व शहरातील दोन मणियार बंधूंवर आमदार मंगेश चव्हाण यांनी थेट गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानंतरही अद्याप या प्रकरणी कोणतीही अधिकृत चौकशी सुरु झालेली नाही, हे विशेष लक्षवेधी ठरत आहे.
गेल्या २९ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत आमदार चव्हाण यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या समोरच या संपूर्ण प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, थेट एलसीबीचे पोनि संदीप पाटील यांच्यावर कार्यपद्धतीविषयी टीका केली. त्यांनी सूचित केलं की, काही दलाल किंवा प्रभावी व्यक्ती पोलीस यंत्रणेशी संलग्न नसतानाही पोलिसांचे काम करत आहेत. अशा व्यक्तींना पोलिसांकडून माहिती कशी मिळते व त्यांना विशिष्ट महिलांचे लोकेशनही कसे मिळते, हे गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे.
आमदार चव्हाण यांनी नाव घेता शहरातील दोन मणियार बंधूंवर थेट आरोप केले, ज्यांनी पोलीस यंत्रणेवर प्रभाव टाकून बाहेरून प्रकरणे हाताळण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्यांनी केला आहे. हे आरोप केवळ आरोप न राहता, त्यामागे काही गंभीर बाबी लपलेल्या असल्याची शक्यता नागरिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. बैठकीनंतर रात्री उशिरापर्यंत आमदार चव्हाण एमआयडीसी पोलीस ठाण्यात उपस्थित होते. मात्र, तिथे देखील कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवली गेली नाही आणि त्या दोन बंधूंची अद्याप चौकशी देखील करण्यात आलेली नाही.
पोलीस व प्रशासनाची गूढ शांतता
आमदारांनी इतक्या थेट व गंभीर स्वरूपाचे आरोप केल्यानंतरही पोलीस निरीक्षक संदीप पाटील व त्यांच्या वरिष्ठांनी यांनी यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ना त्यांनी माध्यमांसमोर खुलासा दिला आहे, ना मणियार बंधूंविरोधात कोणतीही कारवाई झाली आहे. दुसरीकडे, आमदार मंगेश चव्हाण यांनी देखील आरोप केल्यानंतर माध्यमांसमोर खुल्या शब्दांत काहीही बोलणं टाळलं आहे. त्यामुळे जनतेमध्ये संभ्रम व संशयाचं वातावरण तयार झालं आहे.
सामान्यांना नियम, श्रीमंतांना सूट?
या प्रकरणात स्थानिक स्तरावर एक मोठा प्रश्न उपस्थित केला जात आहे. जर या ठिकाणी कोणी सामान्य व्यक्ती असता, तर पोलिसांनी त्याला अटक करून, चौकशी करून, बड्या बातम्या केल्या असत्या. मात्र, श्रीमंत व प्रभावशाली कुटुंबातील या दोघांवर अजून कोणतीही कारवाई झाली नसल्यामुळे "पोलिसांनी सूट दिली का?" असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.
शहरात दबक्या आवाजात अशी चर्चा सुरू आहे की, या प्रकरणात कुठलीतरी मोठी माहिती दडपली जात आहे. मणियार बंधूंना चौकशीसाठीही न बोलावणं, हेच दर्शवतं की कुठेतरी पोलीस यंत्रणेमध्ये दबाव असावा.
या प्रकरणात सच्चाई काय आहे, पोलीस यंत्रणा कोणाच्या दबावाखाली काम करत आहे का, आमदारांचे आरोप कितपत तथ्यपूर्ण आहेत – हे सर्व प्रश्न सध्या अनुत्तरित आहेत. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की, जळगावकर नागरिक आता या संपूर्ण प्रकरणाकडे बारकाईने पाहत आहेत व त्यांना सत्ताधाऱ्यांकडून पारदर्शक उत्तराची अपेक्षा आहे.
टिप्पणी पोस्ट करा