जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात सोमवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने हाहाकार माजविला. सातगाव डोंगरी परिसरात झालेल्या या पावसामुळे सलग दुसऱ्या दिवशी वडगाव (कडे), शिंदाड, वाणेगाव, निंभोरी, राजुरी, वाडी शेवाळे, सार्वे व पिंप्री या गावांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा तडाखा बसला. परिणामी परिसरात पुरस्थिती निर्माण होऊन अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
दगडी नदीसह परिसरातील इतर नदी-नाल्यांना आलेल्या पुरामुळे गावागावात पाणी शिरले आहे. अनेक घरे पाण्याखाली गेली असून संसारोपयोगी साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे. सातगाव डोंगरीकडून मराठवाड्याकडे जाणारा रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. नागरिकांनी भीतीपोटी अख्खी रात्र जागून काढली.
🌊 पूरामुळे गावांना वेढा
पूराच्या पाण्याने वाणेगाव, शिंदाड व निंभोरी या गावांना सर्वाधिक फटका बसला असून गावांचा संपर्क तुटल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक घरांत पाणी शिरल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत.
🐂 पशुधन वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे हाल
अचानक आलेल्या पुराच्या पाण्यात परिसरातील शेकडो जनावरे वाहून गेली. पशुधनाच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. डोळ्यांदेखत जनावरे वाहून जाताना पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले.
दरम्यान, अजूनही या भागात पूरस्थिती कायम असून प्रशासनाकडून मदतकार्य सुरू करण्याची मागणी होत आहे.
टिप्पणी पोस्ट करा