जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत माजी उपमहापौर सुनील महाजन यांनी प्रचंड बहुमताने विजय मिळवत आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा दाखवून दिली. शनिवारी झालेल्या विशेष सभेत महाजन यांनी १५ विरुद्ध २ मतांनी बाजी मारली. त्यांच्या विरोधात शेवटच्या क्षणी उमेदवारी अर्ज दाखल केलेले लक्ष्मण गंगाराम पाटील उर्फ ‘लकी टेलर’ यांना फक्त दोन मतांवर समाधान मानावे लागले.
काही दिवसांपूर्वी बाजार समितीचे माजी सभापती श्यामकांत सोनवणे यांच्या विरोधात १८ पैकी १४ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल करत समितीतील राजकीय समीकरणे ढवळून काढली होती. मात्र, प्रस्तावावर चर्चा होण्याआधीच सोनवणे यांनी आपला राजीनामा दिला. त्यानंतर रिक्त झालेल्या सभापतीपदासाठी आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले.
सभापतीपदाच्या निवडणुकीत सुरुवातीला सुनील महाजन, मनोज दयाराम चौधरी आणि लक्ष्मण पाटील अशी तिरंगी लढत अपेक्षित होती. मात्र मतदानाआधीच मनोज चौधरी यांनी माघार घेतली आणि सामना थेट महाजन विरुद्ध पाटील असा रंगला. मतदानात महाजन यांना तब्बल १५ मते मिळाली, तर पाटील यांना केवळ २ मते मिळाली.
दरम्यान, उपसभापतीपदासाठी गोकुळ चव्हाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निकाल जाहीर होताच महाजन यांच्या समर्थकांनी ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीसह जल्लोष केला. दुसरीकडे, पराभवामुळे ‘लकी टेलर’ म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मण पाटील यांना पुन्हा एकदा सभापतीपद गमवावे लागल्याची हुलकावणी मिळाली.
👉 या निवडणुकीतून जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्तेचे समीकरण पुन्हा एकदा बदलले असून, पुढील काळात महाजन यांच्या नेतृत्वाखाली समितीची धुरा कशी राबवली जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
टिप्पणी पोस्ट करा