Top News

महिला सहकाऱ्याशी गैरवर्तन व कंत्राटी नोकरभरती प्रकरणी डॉ. घोलप निलंबित

आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांचा आदेश; चौकशी अहवाल आस्थापना शाखेकडे पाठवला

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I महापालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय घोलप यांच्यावर दोन गंभीर प्रकरणांमुळे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांनी निलंबनाची कारवाई केली आहे. एका प्रकरणात डॉ. घोलप यांनी सहकारी महिला डॉक्टरशी असभ्य वर्तन केल्याचा आरोप आहे, तर दुसऱ्या प्रकरणात जन्ममृत्यू विभागात महिला कर्मचाऱ्याच्या जागी तिच्या पतीला कामावर ठेवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे.

या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल आयुक्तांना सादर केला होता. त्यानंतर आयुक्त ढेरे यांनी हा अहवाल पुढील तपासासाठी आस्थापना शाखेकडे सुपूर्द केला. विशेष म्हणजे, कंत्राटी नोकरीप्रकरणाचा तपास आधीच सुरू असून, त्याच दरम्यान महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तनाची तक्रारही समोर आली.

सदर तक्रारीनंतर विशाखा समितीमार्फत डॉ. घोलप यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे. डॉ. घोलप यांनी या चौकशीसंदर्भात आपला लेखी खुलासा टपालाद्वारे समितीकडे पाठवला आहे. मात्र, त्यांच्यावर वारंवार होत असलेल्या तक्रारी आणि वाढत्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अखेर त्यांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

महापालिकेतील ही घटना प्रशासनातील अंतर्गत कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असून, या प्रकरणाची चौकशी कशी व कोणत्या दिशेने पुढे जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने