जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I हरीविठ्ठल नगर परिसरातील गटारींच्या कामाची तात्काळ पूर्तता करावी तसेच रिक्षा स्टॉप परिसरात मोबाईल टॉयलेट व सार्वजनिक स्वच्छतागृह उभारणीची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे (मनसे) महापालिका आयुक्तांना निवेदनाद्वारे करण्यात आली. येत्या १० दिवसांत या मागण्यांवर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मनसेने दिला आहे.
हरीविठ्ठल नगर परिसरात काही ठिकाणी काँक्रीट रस्त्यांची कामे झालेली असली तरी गटारींची व्यवस्था करण्यात आलेली नाही. यामुळे पावसाळ्यात पावसाचे पाणी निचरा न होता नागरिकांच्या घरांमध्ये शिरत आहे. या पाण्यामुळे परिसरात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे तातडीने गटारींचे काम पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
तसेच, हरीविठ्ठल नगर परिसर झपाट्याने वाढलेला आणि दाट लोकवस्तीचा भाग असून येथे सार्वजनिक स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध नाही. विशेषतः हरीविठ्ठल नगर रिक्षा स्टॉप परिसरात बाहेरगावाहून येणाऱ्या नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. महिलांसाठी ही समस्या अधिक गंभीर असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे रिक्षा स्टॉप परिसरात तात्काळ मोबाईल टॉयलेट व सार्वजनिक स्वच्छतागृहाची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी मनसेने केली आहे.
मनसेने निवेदनात नमूद केले आहे की, या समस्या नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित आहेत. त्यामुळे प्रशासनाने त्यावर तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे. अन्यथा स्थानिक नागरिकांच्या वतीने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शैलीत मनपा आयुक्त कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
निवेदन देताना जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगराध्यक्ष राजेंद्र निकम, उपमहानगर अध्यक्ष ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, महिला शाखाध्यक्ष अनिता कापुरे, लक्ष्मी भिल, ॲड. सागर शिंपी, संजय मोती तसेच हरीविठ्ठल नगर येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
टिप्पणी पोस्ट करा