जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील उच्चभ्रू कॉलनीतील एका अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या १७ वर्षीय मुलीवर तिच्या आईच्या मित्राने वारंवार विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर संशयित मित्रासह आईवरही विनयभंग आणि पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कॉन्ट्रॅक्टर कुटुंब पत्नी व मुलीसह या अपार्टमेंटमध्ये राहत होते. पत्नीचा मित्र मयूर रमेश शिंपी (रा. कांचननगर) हा वारंवार घरी येत असे. १५ फेब्रुवारी २०२५ रोजी संध्याकाळी साडेसात वाजता कॉन्ट्रॅक्टर घरी नसताना मयूर शिंपी पिझ्झा पार्सल घेऊन आला. महिला किचनमध्ये असताना त्याने पीडित मुलीच्या पाठीवरून हात फिरवला आणि नंतर टीव्ही बंद करताना तिला मिठी मारली. ही बाब मुलीने आईला सांगितली, मात्र आईने दुर्लक्ष केले.
यानंतर २८ फेब्रुवारी रोजी पुन्हा मयूर शिंपी घरी आला आणि महिलेसमोरच मुलीचा हात पकडून त्याचे चुंबन घेतले. पीडितेने विरोध केल्यावर आईनेच "तू मुलगी आहेस, आज ना उद्या तुला हे करायचे आहे" असे म्हणून मयूरच्या कृतीचे समर्थन केले. पुढे १२ जून रोजी मयूरने मुलगी शिकत असलेल्या अकॅडमीत जाऊन क्लासच्या जिन्यावर तिचा हात पकडून लज्जास्पद कृत्य केले, अशीही तक्रार मुलीने दिली आहे.
या तक्रारीनंतर शहर पोलिस ठाण्यात मयूर रमेश शिंपी आणि पीडितेची आई या दोघांविरुद्ध विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अशोक खेडकर करीत आहेत. दरम्यान, संशयित मयूर शिंपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
टिप्पणी पोस्ट करा