पाचोरा, निखिल वाणी I शहरात आज सायंकाळच्या सुमारास खळबळजनक घटना घडली असून, पाचोरा बस स्थानक परिसरात भर गर्दीत एका युवकावर अज्ञात इसमाने गोळीबार केला. या हल्ल्यात आकाश मोरे (वय अंदाजे २५) या युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश मोरे हा सार्वजनिक ठिकाणी उभा असताना एक अनोळखी व्यक्ती त्याच्याजवळ आला आणि काहीच क्षणांत जवळून पाच राउंड गोळ्या झाडल्या. गोळ्या लागून मोरे घटनास्थळीच कोसळला आणि जागीच मृत्यूमुखी पडला.
गोळीबार झाल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली. नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिल्यानंतर काही मिनिटांतच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसर सील करण्यात आला आहे.
पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. हत्या नेमकी कोणत्या कारणातून झाली, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. मात्र, प्राथमिक तपासात जुन्या वादातून ही घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
सध्या पाचोरा शहरातील ही घटना चर्चेचा विषय बनली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अधिक तपास पाचोरा पोलिसांकडून सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा