चाळीसगाव, अमोल चौधरी I शहरातील भडगाव रोडवरील बसस्थानकासमोर असलेल्या विनायक प्लाझा हॉटेल अॅन्ड रेसिडेन्सी या लॉजमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर चाळीसगाव शहर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली. या कारवाईत दोन महिला अनैतिक व्यवसाय करताना आढळून आल्या असून, व्यवस्थापकासह तिघांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बनावट ग्राहक पाठवून सापळा
दिनांक ३ जुलै २०२५ रोजी पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांना उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्याकडून विनायक प्लाझा लॉजमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी बनावट ग्राहकांमार्फत सापळा रचला. बनावट ग्राहकांना १५००/- रुपयांच्या नोटांसह लॉजमध्ये पाठवण्यात आले. सौदा निश्चित झाल्याची खात्री मिळाल्यावर पोलिसांनी तात्काळ लॉजवर धाड टाकली.
रुम क्रमांक १०६ आणि २०८ मध्ये दोन महिला ग्राहकांसोबत आढळून आल्या. कारवाईदरम्यान पोलिसांनी रोख ₹२३,०१०/-, तीन मोबाइल फोन (Oppo, Vivo, OnePlus), कंडोमचे बॉक्स असा मुद्देमाल जप्त केला.
तिघांना अटक; महिला सुधारगृहात
लॉज व्यवस्थापक प्रसाद राजेंद्र गवळी (वय २१) याच्याकडून बनावट ग्राहकांनी दिलेल्या पाचशेच्या नोटा व मोबाईल हस्तगत करण्यात आला. तसेच लॉजचे मालक मनोज छगन गवळी (रा. फुले कॉलनी, चाळीसगाव) यांचाही तपास सुरू आहे. पोलिसांनी या कारवाईत व्यवस्थापकासह तिघांना अटक केली असून, पीडित महिलेला धुळे महिला सुधारगृहात पाठवण्यात आले आहे.
या प्रकरणी अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायदा १९५६ अंतर्गत कलम ३, ४, ५, ७ व ८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेळ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पो.उ.नि. संदीप घुले, पो.हे.कॉ. योगेश बेलदार, विनोद पाटील, भूपेश वंजारी, पो.ना. नितीन आगोणे, पो.कॉ. आशुतोष सोनवणे, राकेश महाजन, पवन पाटील, महिला पोलीस मालती बच्छाव आणि मयुरी शेळके यांचा समावेश होता.
टिप्पणी पोस्ट करा