गोदावरी इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी पहिल्याच दिवशी घेतला उत्स्फूर्त प्रतिसाद
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या घोषणांच्या वातावरणात पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा सामाजिक मराठी चित्रपट ‘ते १० दिवस’ आज, सोमवार दि. 29 जुलै रोजी प्रदर्शित झाला. राघव फिल्म प्रोडक्शन आणि बंधन प्रोडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित या चित्रपटाचा पहिला शो जळगाव येथील गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांना दाखविण्यात आला. विद्यार्थ्यांनी या चित्रपटाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गेल्या अनेक दशकांपासून महाराष्ट्रात गणपती उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. मात्र श्रद्धेपोटी किंवा नकळतपणे या उत्सवातून पाणी प्रदूषणाचा प्रश्न अधिक गंभीर होत असल्याचे चित्रपटातून प्रभावीपणे दाखवले आहे. ‘ते १० दिवस’ या चित्रपटाची निर्मिती देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी यांनी 2022 साली ‘मन की बात’ या कार्यक्रमातून केलेल्या नैसर्गिक गणेश उत्सव, मातीचे गणपती आणि पाणी प्रदूषण निवारण या संदेशावर आधारित आहे.
चित्रपटात पर्यावरण संवर्धन, पाणी संरक्षण आणि नैसर्गिक गणेश उत्सवाचे महत्त्व यांचा सशक्त संदेश देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना हा चित्रपट दाखवून समाजात जागृती निर्माण करण्याचा उपक्रम संपूर्ण टीमने हाती घेतला आहे.
या विशेष प्रदर्शन सोहळ्यास भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राधेश्याम चौधरी, गोदावरी आय.एम.आर कॉलेजचे संचालक व गोदावरी फाउंडेशनचे प्रतिनिधी डॉ. प्रशांत वारके, दैनिक देशोन्नतीचे संपादक मनोज बारी, गोदावरी इंग्लिश स्कूलच्या प्रिन्सिपल नीलिमा चौधरी, तसेच लेखक-दिग्दर्शक प्रशांत सोनवणे उपस्थित होते.
‘ते १० दिवस’ हा चित्रपट सर्वच वयोगटातील प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. मायबाप रसिक प्रेक्षकांनी आमच्या प्रयत्नांना यश द्यावे, अशी विनंती चित्रपटाच्या टीमतर्फे करण्यात आली आहे.
टिप्पणी पोस्ट करा