Top News

सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचा जळगावात समारोप, पंजाब संघ विजेता

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
आपल्या दमदार खेळीच्या जोरावर पंजाब संघाने कर्नाटक संघावर २-० ने विजय मिळवून सलग दुसऱ्या वर्षी १७ वर्षांखालील सीआयएससीई राष्ट्रीय प्री-सुब्रोतो कप महिला फुटबॉल स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. उपविजेता कर्नाटक संघाने उत्कृष्ट बचावफळी उभारून लढा दिला, मात्र विजयाचे भाग्य पंजाबच्या बाजूने राहिले. खेळाच्या मैदानात हार-जीत होणं स्वाभाविक असतं, पण स्पर्धेच्या माध्यमातून संघभावना आणि समन्वयाची जाणीव होते, असे मत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केले.

पारितोषिक वितरण समारंभात विजयी आणि उपविजयी संघाचा चषक व रोख पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. या प्रसंगी सीआयएससीईचे अर्णवकुमार शॉ, सिद्धार्थ किर्लोस्कर, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, अनुभूती स्कूलचे अध्यक्ष अतुल जैन, संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य देबाशीस दास, मुख्य पंच ललिता सावंत, जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे सचिव फारूख शेख, जैन स्पोर्ट्स अॅकडमीचे अरविंद देशपांडे, प्रशिक्षक अब्दुल मोहसीन आदी मान्यवर उपस्थित होते.

या स्पर्धेत देशभरातील नऊ राज्यांतील १४४ खेळाडूंनी सहभाग घेतला. १९ सामन्यांमध्ये एकूण ७० गोल नोंदवण्यात आले. स्पर्धा साखळी व बाद फेरी अशा दोन्ही स्वरूपात पार पडली. उपांत्य फेरीत कर्नाटकने बिहारचा आणि पंजाबने महाराष्ट्राचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.

अंतिम सामन्यात पंजाबच्या संत बाबा हरीसिंग मॉडर्न स्कूल आणि कर्नाटकच्या ग्रीनवुड हायस्कूल, सर्जापूर यांच्यात रंगतदार लढत पाहायला मिळाली. पहिल्या अर्ध्या भागात दोन्ही संघांकडून गोलसाठी प्रयत्न झाले, मात्र दुसऱ्या सत्रात पंजाबने दोन झटपट गोल करत सामना आपल्या बाजूने फिरवला आणि विजय साजरा केला. विजयानंतर पंजाबच्या खेळाडूंनी पारंपरिक नृत्य सादर करून आनंदोत्सव साजरा केला.

उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान

सर्वोत्कृष्ट गोलकिपर – महाराष्ट्राची फातेमा दलाल

सर्वाधिक गोल (१०) – पंजाबची जोया हसन, तिला ‘मॅन ऑफ द मॅच’ पुरस्कारही मिळाला.

सर्वोत्कृष्ट बचावपटू – पंजाबची सोनिया अटवाल

उत्कृष्ट खेळाडू (कर्नाटक) – अर्पिता तानिया

अर्णव शॉ यांनी अनुभूती स्कूलच्या उत्कृष्ट आयोजनाचे कौतुक केले. सौ. निशा जैन यांनी यजमानपदाबद्दल सीआयएससीईचे आभार मानत पुढील काळात क्रिकेट व तायक्वांडो स्पर्धांचे आयोजन करण्याचा मानस व्यक्त केला. मुख्य पंच ललिता सावंत यांनी स्पर्धेतील वैशिष्ट्ये उलगडून सांगितली.

अतुल जैन व अशोक जैन यांनी मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन पलक संघवी हिने केले. प्राचार्य देबाशीस दास यांनी आभार मानले. राष्ट्रगीताने समारोप करण्यात आला.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी जैन इरिगेशन सिस्टीम्स लि., अनुभूती निवासी स्कूल, जैन स्पोर्ट्स अॅकडमी यांच्या सहकाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने