Top News

सागवान झाडे तोडण्यास परवानगी देण्यासाठी लाच मागितल्याप्रकरणी दोन वनकर्मचारी अटकेत

पारोळा, निखिल वाणी I शेतातील सागाची झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यासाठी आठ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या प्रकरणात वन विभागातील दोन कर्मचाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगेहाथ अटक केली. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

पारोळा तालुक्यातील एका नागरिकाचा सागवान लाकूड खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांनी इंधवे शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतातील सागवान झाडे साठ हजार रुपयांना खरेदी करण्याचा व्यवहार केला होता. यासाठी अधिकृत परवानगी घेण्यासाठी संबंधित व्यापाऱ्याने वन विभागाकडे आवश्यक अर्ज सादर केला होता.

या अर्जावर प्रक्रिया करण्यासाठी वनपाल दिलीप भाईदास पाटील आणि वनपाल वैशाली ज्ञानेश्वर गायकवाड या दोघांनी आठ हजार रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले. तक्रारदाराने ही बाब लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे कळवली. त्यानंतर विभागाने सापळा रचून आज दोन्ही वनपालांना लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले.

या कारवाईदरम्यान महिला वनपाल वैशाली गायकवाड यांना नोटीस देऊन सोडण्यात आले असून, दिलीप पाटील यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीवायएसपी योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली सफौ सुरेश पाटील, मपोहेकॉ शैला धनगर, पोहेकॉ किशोर महाजन, पोकॉ राकेश दुसाने आणि पोकॉ अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने