Top News

शहीद अब्दुल हमीद यांची जयंती तांबापुरा परिसरात उत्साहात साजरी; वीरतेच्या आठवणींना उजाळा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
परमवीर चक्र विजेता शहीद अब्दुल हमीद यांची जयंती आज जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात अत्यंत उत्साहात व अभिमानाने साजरी करण्यात आली. शहीद अब्दुल हमीद चौक, जो की गेल्या 20 वर्षांपासून या परिसरातील ओळख आहे, येथे विविध सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत माल्यार्पण करून वीर सैनिकाच्या स्मृतीला मानवंदना देण्यात आली.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी अब्दुल हमीद यांचे 1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धातील शौर्याचे प्रसंग उपस्थितांना सांगितले. शहीद हमीद यांनी युद्धात पाकिस्तानचे 7 रणगाडे (टॅंक) एकटे नष्ट करताना अत्यंत शौर्य दाखवले होते. त्यांच्या या अद्वितीय पराक्रमामुळे त्यांना देशाचा सर्वोच्च वीरता पुरस्कार 'परमवीर चक्र' मरणोत्तर प्रदान करण्यात आला होता.

कार्यक्रमात जमील भाई, आसिफशा, बापू इम्रान, पोलीस कर्मचारी इस्माईल भाई खान, सज्जाद भाई, नवी दादा, अखिल भंगारवाला, अजित शहा, बाबा अमित, बाली भाई आणि इद्रिस बागवान यांच्यासह परिसरातील अनेक नागरिक उपस्थित होते. या सर्वांनी शहीदाच्या स्मरणार्थ चौकातील पाटीला माल्यार्पण केले आणि त्यांच्या शौर्याचा गौरव केला.

तांबापुरा परिसरातील नागरिकांनी यावेळी अभिमानाने सांगितले की, शहीद अब्दुल हमीद यांच्याच नावाने असलेला हा चौक त्यांच्या सामाजिक पुढाकारातून उभा राहिला असून तो गेली दोन दशके या परिसराची शान ठरला आहे. उपस्थित मान्यवरांनी यावेळी देशभक्ती, वीर सन्मान आणि नव्या पिढीला प्रेरणा देणाऱ्या विचारांची मांडणी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने