Top News

शासनाच्या कर धोरणांविरोधात जळगावात बिअर बार व वाईन शॉप चालकांचा मूक मोर्चा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्य शासनाच्या वाढत्या वॅट, नूतनीकरण शुल्क आणि एक्साईज ड्युटीच्या विरोधात जळगाव शहरात आज बिअर बार व वाईन शॉप चालकांनी एकत्र येत मूक मोर्चा काढला. शिवतीर्थ मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात सहभागी दुकानदार, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी शांततेच्या मार्गाने शासनाच्या निर्णयाचा निषेध केला.

व्यवसाय संकटात, उद्योगावर गडद सावली
जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशन व बिअर बार मालक संघटनेच्या नेतृत्वाखाली आयोजित या आंदोलनात संपूर्ण मद्यविक्री व्यावसायिकांनी आपली दुकाने बंद ठेवली होती. वाढीव कर दरामुळे व्यवसाय धोक्यात आला असून,
- वॅटमध्ये १०% वाढ,
- नूतनीकरण शुल्कात १५% वाढ,
- आणि एक्साईज ड्युटी तब्बल ६०% पर्यंत वाढल्याने व्यावसायिकांवर मोठा आर्थिक बोजा निर्माण झाल्याचा आरोप संघटनेने केला.

शांततापूर्ण मोर्चा, तीव्र आंदोलनाचा इशारा

संघटनेचे जिल्हाध्यक्ष ललित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या मूक मोर्चादरम्यान जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना निवेदन सादर करण्यात आले. सरकारने तातडीने हा अन्यायकारक निर्णय मागे घ्यावा, अशी ठाम मागणी यामध्ये करण्यात आली.

"या धोरणांमुळे संपूर्ण उद्योगच कोलमडण्याच्या मार्गावर आहे, अनेक व्यावसायिक दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभे आहेत," असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.

जर शासनाने लवकरात लवकर निर्णय मागे घेतला नाही, तर राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेकडून देण्यात आला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने