जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
जळगाव शहरातील आर. आर. विद्यालयात घडलेल्या नववीच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी मोठा खुलासा समोर आला आहे. नववीत शिकणाऱ्या कल्पेश इंगळे (वय १५) या विद्यार्थ्याचा मृत्यू नैसर्गिक नसून, शाळेतीलच एका अल्पवयीन मित्राने मारहाण केल्यामुळे झाला, अशी धक्कादायक माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.
या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, शाळेतील विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पेश इंगळे आणि संबंधित अल्पवयीन मुलामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान मारहाणीत झाले आणि त्यात कल्पेशचा मृत्यू झाला.
पोलीसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवत संशयित अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असून, या घटनेमागील अचूक कारण जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
दरम्यान, मृत कल्पेश इंगळे याच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यसंस्कार उरकले असल्याचेही अधिकारी संदीप गावित यांनी स्पष्ट केले.
या प्रकरणाची अधिक चौकशी सुरू असून, शाळेतील वातावरण व सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाकडून अधिक कडक पावले उचलली जाण्याची शक्यता आहे.
टिप्पणी पोस्ट करा