Top News

ब्रेकींग I जळगावात वाहतूक पोलिसांवर कोयता, साखळीने हल्ल्याचा प्रयत्न; पाच जणांवर गुन्हा दाखल

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील बेंडाळे चौकात राणी लक्ष्मीबाई पुतळ्याजवळ शासकीय कामात अडथळा आणत वाहतूक पोलिसांशी वाद घालून त्यांच्यावर कोयता व लोखंडी साखळीने हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी १०.३० वाजता घडली. या प्रकरणी रात्री उशिरा शनीपेठ पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घटनास्थळी वाहतूक शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर कोळी आणि त्यांचे सहकारी शासकीय कर्तव्य बजावत होते. याचवेळी अल्ताफ अहमद अब्दुल गफूर (६४), मुजम्मिल अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (३०), जुबेर अहमद अल्ताफ अहमद रंगरेज (३८), तिघेही रा. बालाजी पेठ, तसेच अरुण रामदास टिलोरे (६७, रा. समतानगर) व आदिल बेग शरीफ बेग (२७, रा. रामनगर) या पाच जणांनी पोलिसांशी हुज्जत घालत अश्लील शिवीगाळ केली.

वाद अधिक चिघळल्यावर, आरोपींपैकी एकाने आपल्या मोटरसायकलच्या (एमएच १९ बीएन ००७८) डिक्कीतून धारदार लोखंडी कोयता आणि लोखंडी साखळी काढून पोलिसांवर धाव घेत धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे शासकीय कामात अडथळा निर्माण झाला.

पोलीस कॉन्स्टेबल कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सर्व पाच आरोपींविरुद्ध शासकीय कामात अडथळा, पोलिसांवर हल्ल्याचा प्रयत्न व इतर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश ढिकले करीत आहेत.

या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट असून, शासकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने