Top News

तरुणीला धमकावून जबरदस्ती घालायला लावला बुरखा ; विरोध करताच जीवे मारण्याची दिली धमकी, दोघांविरोधात गुन्हा दाखल


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील एका प्रसिद्ध मॉलमध्ये खरेदीसाठी आलेल्या तरुणीचा पाठलाग करत, तिला आत्महत्येची धमकी देत जबरदस्तीने बुरखा परिधान करण्यास लावल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत दोघा संशयितांना ताब्यात घेतले असून, पीडित तरुणीच्या तक्रारीवरून फरहान हकीम खाटीक (वय २३) आणि त्याचा मित्र जमील कुरेशी (दोघे रा. किनगाव, ता. यावल) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पूर्वीची ओळख बनली त्रासदायक

मिळालेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात राहणारी तरुणी फार्मसीचे शिक्षण घेत आहे. त्याच महाविद्यालयात फरहान खाटीक हा तिसऱ्या वर्षाला शिक्षण घेत असून, कॉलेजमध्ये एकाच बसने ये-जा करत असल्याने त्यांच्यात ओळख झाली होती. याच ओळखीचा गैरफायदा घेत फरहानने सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. "प्रेमात जात-पात नसते" असे सांगत त्याने तिला प्रपोज केले आणि नकार दिल्यास आत्महत्या करण्याची धमकीही दिली.

पुढे काही काळ तरुणीला प्रेमाच्या नावाखाली गुंतवत, फरहानने सोशल मीडियावरून एका धर्माचे व्हिडीओ पाठवून तिच्या मनात त्या धर्माबाबत आपुलकी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ही बाब कोणीही ऐकू नये म्हणून त्याने तिच्यावर मानसिक दबाव टाकला, त्यामुळे तरुणी घाबरून गप्प बसली होती.

D-Mart मध्ये धमकी आणि गर्दीचा गोंधळ

बुधवारी सकाळी पीडित तरुणी काही खरेदीसाठी डीमार्ट येथे आली होती. त्यावेळी फरहान आणि त्याचा मित्र जमील कुरेशी तिचा पाठलाग करत तेथे पोहोचले. फरहानने तिला जबरदस्तीने बुरखा घालण्यास सांगितले. बुरखा न घातल्यास आत्महत्या करेल, अशी धमकी दिल्याने तरुणीने घाबरून डीमार्टच्या चेंजिंग रूममध्ये बुरखा परिधान केला.

यानंतर फरहानने तिच्यासोबत खरेदी करण्यास भाग पाडले. मात्र बिलाच्या काऊंटरवर तरुणीने बुरखा काढण्यास सांगितले असता, फरहानने "बुरखा काढला तर मारून टाकेल" अशी धमकी दिली. हे संवाद आसपासच्या लोकांनी ऐकले आणि त्यांना संशय आल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी जमा झाली. परिसरात तणाव निर्माण झाला.


पोलीसांनी वेळीच घेतली धाव

घटनेची माहिती मिळताच डायल ११२ वरून कळविण्यात आले. रामानंदनगर पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पाटील, संदीप वाघ, सुधाकर अंभोरे, अतुल चौधरी, शरद वंजारी, सिद्धेश्वर डापकर आदींनी घटनास्थळी तातडीने धाव घेतली. त्यांनी तरुणीसह दोघा संशयितांना ताब्यात घेत पोलीस ठाण्यात आणले.


तक्रारीनुसार गुन्हा दाखल

पोलीस ठाण्यात तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून फरहान हकीम खाटीक आणि जमील कुरेशी यांच्याविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने