Top News

मजूर वाहून नेणारी मिनी ट्रक उलटली; एकाचा मृत्यू, २१ जण जखमी


रावेर, निखिल वाणी I तालुक्यातील पाल येथील गारबर्डी गावाजवळ बुधवारी (४ जून) सायंकाळी सुमारे पाच वाजता एक भीषण अपघात घडला. मजुरांनी भरलेली मिनी ट्रक बोरघाटातील वळणावर उलटल्याने एक मजूर जागीच ठार झाला असून इतर २१ मजूर गंभीर जखमी झाले आहेत. अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

या घटनेतील मृत व्यक्तीची ओळख अनिल बारेला (वय २०, रा. मलगात कोठा, ता. खरगोन, म.प्र.) अशी झाली आहे. तोही या ट्रकमधून प्रवास करत होता आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील मलगात कोठा (ता. खरगोन) येथील रहिवासी असून, काम आटपून पाल परिसरातून आपल्या गावी परत जात होते. गारबर्डी जवळ ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन रस्त्याच्या कडेला उलटले. अपघात इतका भीषण होता की, मिनी ट्रकमधील अनेक मजूर जखमी अवस्थेत ट्रकमध्ये अडकून पडले होते.

अपघातानंतर तातडीने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना मिनी ट्रकमधून बाहेर काढून पाल ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी हलवण्यात आले. परंतु, अपघातग्रस्त भागात ‘१०८’ आपत्कालीन रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचल्याने जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यासाठी तब्बल तीन तासांचा विलंब झाला. शेवटी एका ट्रकमधून त्यांना उपचारासाठी हलवण्यात आले. त्यानंतर गंभीर जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

या अपघातात जखमी झालेल्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत –

भूरीबाई बारेला, लाडकीबाई भिलाला, नूरलीबाई भिलाला, सुमलीबाई बारेला, लक्ष्मी बारेला, शेवजा बारेला, रूपा बारेला, दयाराम बारेला, पार्वती बारेला, सविता बारेला, आशा बारेला, विकास बारेला, हिरालाल बारेला, सुभान भिलाला, सुरेश भिलाला, विजय बारेला, ममता बारेला, सायजी बारेला, रखजीता बारेला, जितू बारेला, शेंगा बारेला. यातील अनिल बारेला याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघातामुळे पाल व परिसरात हळहळ व्यक्त होत असून, आपत्कालीन सेवा वेळेवर उपलब्ध न झाल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने या अपघाताची गंभीर दखल घेऊन संबंधित जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने