Top News

‘मन की बात’ व आणीबाणी दिनानिमित्त व्याख्यानाचे आयोजन; आणीबाणी लढ्यातील सेनानींचा सत्कार

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या सरदार वल्लभभाई पटेल मंडळ क्र. ३ यांच्या वतीने दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी पार पडणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ कार्यक्रमाचा १२३ वा भाग महाबळ परिसरातील रायसोनी नगर येथील दधीचा आश्रम येथे थेट प्रक्षेपणाद्वारे साजरा करण्यात आला. यावेळी परिसरातील नागरिकांनी एकत्र येत पंतप्रधानांचा जनतेशी थेट संवाद अनुभवला.

या कार्यक्रमात आणीबाणी दिनाच्या निमित्ताने विशेष व्याख्यानाचेही आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक श्री. विश्वासराव कुलकर्णी यांनी आणीबाणी काळातील भयावह वास्तव आणि स्वातंत्र्याची गळचेपी याविषयी आपले अनुभव कथन केले. “१९७५ मध्ये तत्कालीन काँग्रेस सरकारने देशावर लादलेली आणीबाणी ही सत्तेची लालसा होती. हे काळे पर्व देशासाठी अन्यायमूलक ठरले होते,” असे ते म्हणाले.

या प्रसंगी आणीबाणी काळात प्रत्यक्ष लढा देणाऱ्या आणि मीसांत (MISA) बंदिवास भोगणाऱ्या सेनानींचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. सत्कारमूर्तींमध्ये विश्वासराव कुलकर्णी, मुकुंद जोगदेव, इच्छाराम वाणी, सत्यनारायण तिवारी, परेश नेवे, बुधव तायडे यांचा समावेश होता.

कार्यक्रमाला जळगाव शहराचे आमदार सुरेश दामू भोळे (राजू मामा) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय मंडल अध्यक्ष अजित राणे, माजी महानगर जिल्हाध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, सरचिटणीस महेश जोशी, जितेंद्र मराठे, ज्योतीताई निंभोरे, उपाध्यक्ष राहुल वाघ, नितीन इंगळे, माजी नगरसेविका गायत्रीताई राणे, सुरेखाताई तायडे, भूपेश कुलकर्णी, अक्षय चौधरी, नीलाताई चौधरी, वंदना पाटील, सुनील पाटील, रूपाली देसाई, पुनम तिवारी, अनिता पाटील, तसेच कार्यक्रमाचे संयोजक कुंदन देसले, तेजस काटे, केतन मिटकर, दिनेश सोनार, मयूर ठाकरे, प्रशांत शुक्ल, हेमंत भांगाळे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी संपूर्ण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. देशप्रेम, संविधाननिष्ठा आणि लोकशाहीचे महत्व अधोरेखित करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने