जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
एरंडोल, निखिल वाणी I येथील माजी उपनगराध्यक्ष दशरथ बुधा महाजन यांच्यावर झालेला हल्ला हा अपघात नसून पूर्वनियोजित कट होता, अशी माहिती पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणी तिघा संशयितांना अटक केली आहे.
१४ जून रोजी माजी नगरसेविका कल्पना महाजन यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. दशरथ महाजन यांचे काही राजकीय नेत्यांशी मतभेद होते, त्यामुळे हा हल्ला घातपाताचा असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता. प्रकरणाच्या गंभीरतेमुळे तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथकांची स्थापना करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलीस हवालदार प्रवीण मांडोळे व राहुल कोळी यांनी पेट्रोल पंपावरील तब्बल ८ तासांचे फुटेज तपासून आरोपी ओळखले.
या तपासातून उमेश उर्फ बदक सुरेश सुतार (४०), शुभम कैलास महाजन (१९), व पवन कैलास महाजन (२०, सर्व रा. एरंडोल) या तिघांना अटक करण्यात आली. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, मुख्य आरोपी उमेश याने पूर्ववैमनस्यातून हा हल्ला केल्याचे सांगितले आहे.
गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडीही जप्त करण्यात आली आहे. अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून, या कटामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा कसून तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केली.
टिप्पणी पोस्ट करा