Top News

जळगावात दोन ट्रकची समोरासमोर धडक: एक चालक ठार, दुसरा गंभीर जखमी


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I– शहरातून भुसावळकडे जाणाऱ्या महामार्गावरील स्वामी नारायण मंदिराजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन एका ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे. या अपघातामुळे काही वेळ महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

सकाळी साडेसातच्या सुमारास घडलेल्या या घटनेत ओडिशा पासिंगचा ट्रक (क्र. ओडी-१५-सी-२९६३) आणि राजस्थान पासिंगचा ट्रक (क्र. आरजे-१४-जीटी-०४२१) समोरासमोर आले. धडक इतकी भीषण होती की एक ट्रक चालक केबिनमध्ये अडकून गेला. अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दोरीच्या सहाय्याने चालकाला केबिनमधून बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.

दरम्यान दुसऱ्या ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याच्या डोळ्याला मोठी इजा झाली आहे. त्यास तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

वाहतूक काही वेळ ठप्प, पोलिसांनी केली मार्गमोकळा

अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच वाहतूक विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून वाहतूक सुरळीत केली.

या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले तरी, प्राथमिक माहितीनुसार रस्ता ओलांडताना एका ट्रकने वेगावर नियंत्रण गमावल्यामुळे ही धडक झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने