Top News

राष्ट्रवादीचे शरद पवार गटातील एकनाथ खडसे व्यासपीठाबाहेर – राजकीय संकेत स्पष्ट?


खडसे उपस्थित, पण अनुलक्षित – मुख्यमंत्री फडणवीसांनी कटाक्षही टाळला, मुख्यमंत्रींच्या कार्यक्रमात खडसे यांची उपेक्षा? व्यासपीठाऐवजी समोर बसण्याची वेळ

धरणगाव, अरुण पाटील I मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जळगाव दौऱ्यात शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवून निषेध नोंदवला. याच पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री आमदार एकनाथ खडसे यांनी मात्र या दौऱ्यातील कार्यक्रमाला उपस्थित राहून सर्वांचे लक्ष वेधले. मात्र, त्यांची उपेक्षा झाल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगत आहे.

धरणगाव येथे क्रांतिकारक ख्वाजा नाईक स्मारकाचे लोकार्पण, उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन आणि जामनेर तालुक्यातील गोद्री येथील हिंदू गोरबंजारा-लभाना समाजाच्या कुंभ प्रेरणास्थळ स्मारकाच्या भूमिपूजनासाठी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. या कार्यक्रमाला महायुतीमधील सर्व मंत्री, आमदार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विशेष म्हणजे, खडसे यांची उपस्थिती लक्षवेधी असतानाही त्यांना व्यासपीठावर न बसवता समोरच्या प्रेक्षकांसाठी असलेल्या खुर्च्यांमध्ये बसवण्यात आले. व्यासपीठावर केवळ महायुतीचे आमदार, खासदार आणि मंत्री उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणादरम्यानही खडसे यांच्याकडे साधा कटाक्ष टाकला गेला नाही, तसेच त्यांच्या नावाचा उल्लेखही झाला नाही. यामुळे त्यांच्याबाबत झालेल्या वागणुकीवरून उपस्थितांमध्ये चटकन कुजबुज सुरू झाली.

कार्यक्रमाआधी जळगाव विमानतळावर पत्रकारांनी खडसे यांच्या उपस्थितीबाबत विचारल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी "त्याबाबत मला माहिती नाही" असे सांगत विषय टाळला. नंतर खडसे कार्यक्रमस्थळी पोहोचले असतानाही, कोणतीही औपचारिक स्वागताची भूमिका न घेतल्याचे चित्र होते.

यानंतर माध्यमांशी बोलताना खडसे यांनी "हा कार्यक्रम सरकारचा नव्हे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा होता. त्यामुळेच व्यासपीठावर केवळ मंत्री, खासदार व आमदार यांच्यासाठीच जागा ठेवण्यात आली होती," अशी प्रतिक्रिया दिली. ते पुढे म्हणाले की, “जर हा कार्यक्रम शासकीय स्वरूपाचा असता, तर जिल्ह्यातील सर्व आमदारांना व्यासपीठावर स्थान मिळाले असते.”

या संपूर्ण घडामोडींमुळे खडसे यांना जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आले का? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. महायुतीत असूनही खडसे यांची उपेक्षा ही पक्षांतर्गत तणावाची झलक दर्शवते का, यावरून पुढील काही दिवसांत राजकीय चर्चांना ऊत येण्याची शक्यता आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने