Top News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगावमध्ये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन

आरोग्य सुविधांसाठी ३९ कोटी ४६ लाखांचा प्रकल्प – पालकमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I 
धरणगाव येथील ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारण्यात येणार असून, या कामाच्या शुभारंभासाठी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्य इमारत व वैद्यकीय अधिकारी निवासस्थानाच्या बांधकामाचा समावेश होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील होते. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खासदार स्मिता वाघ, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किरण पाटील, अधीक्षक अभियंता पी. पी. सोनवणे, कार्यकारी अभियंता सुभाष राऊत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी शासनाकडून ३९ कोटी ४६ लाख ७५ हजार रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून, २.५ एकर क्षेत्रात उपजिल्हा रुग्णालय आणि ट्रामा केअर सेंटर उभारण्यात येणार आहे. यामुळे तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होणार असून नागरिकांना शस्त्रक्रिया, स्त्रीरोग, बालरोग, बधिरीकरण आदी तज्ज्ञ सुविधा मिळणार आहेत.

नवीन रुग्णालयात बाह्यरुग्ण व आंतररुग्ण विभाग, माता व बाल संगोपन विभाग, तात्काळ उपचार कक्ष, प्रयोगशाळा, प्रसूतीगृह, शवविच्छेदन कक्ष, रुग्णवाहिका सेवा, नवजात अर्भक काळजी, क्ष-किरण, न्यायवैद्यकीय सेवा, नेत्र तपासणी, कुटुंबकल्याण, लसीकरण, रक्तपुरवठा केंद्र आणि संक्रमण प्रतिबंधक सुविधा असणार आहेत.

धरणगाव हे ऐतिहासिक शहर असून, बालकवी ठोंबरे यांच्या स्मारकाशेजारी ही सुविधा उभारली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणे हा तालुक्यासाठी गौरवाचा क्षण आहे. "एकही रुग्ण आरोग्य सेवांपासून वंचित राहू नये यासाठी ही सुविधा उपयुक्त ठरेल," असे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांचे आभार मानले.

नवीन पोलीस ठाण्यांची मागणी
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाळधी (धरणगाव पोलीस ठाण्याअंतर्गत) आणि म्हसावद (एमआयडीसी पोलीस ठाण्याअंतर्गत) या दूरक्षेत्रांना स्वतंत्र पोलीस ठाण्याचा दर्जा देण्याची मागणी केली. तसेच जीर्ण झालेल्या धरणगाव पोलीस ठाणे आवाराच्या जागी ५० शासकीय निवासस्थानांचे बांधकाम करण्यासाठी अंदाजे १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्याची विनंती निवेदनाद्वारे केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन दिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने