जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
शहरातील राष्ट्रीय महामार्गावर रविवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात महसूल विभागातील शिपाई पदावर कार्यरत असलेल्या 44 वर्षीय कर्मचाऱ्याचा कंटेनरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला. अपघातानंतर कंटेनर चालक वाहनासह घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव विशाल रमेश सोनार (वय 44, रा. पाळधी) असे आहे. ते आज दुपारी साडेदोन ते तीनच्या सुमारास पाळधीकडून जळगाव शहराच्या दिशेने जात असताना महामार्गावरील शिव कॉलनी स्टॉपजवळ रस्ता ओलांडत होते. याचवेळी भरधाव वेगात आलेल्या अज्ञात कंटेनरने त्यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की विशाल सोनार यांना कंटेनरने अक्षरश: चिरडले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावर न थांबता वाहन घेऊन पसार झाला. घटनेची माहिती मिळताच MIDC पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून तो एका खाजगी वाहनातून जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलवला. मृत व्यक्तीच्या खिशातून ओळखपत्र सापडल्याने त्यांची ओळख पटली.
विशाल सोनार हे महसूल विभागात शिपाई म्हणून कार्यरत होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. त्यांच्या अकस्मात निधनाने नातेवाईक, सहकारी आणि परिसरातील नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.
दरम्यान, या अपघाताची माहिती कळताच विशाल सोनार यांचे नातेवाईकही तातडीने रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांकडून कंटेनर आणि चालकाचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेतली जात असून, अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
MIDC पोलिस स्टेशनमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू असून, लवकरच कंटेनर चालकाला ताब्यात घेण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
टिप्पणी पोस्ट करा