जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
महावितरणच्या कंत्राटी वायरमनने वीज मीटर टेस्टिंगच्या रिपोर्टसाठी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली. अँटी करप्शन ब्युरोने आज (10 जून) जळगाव येथे सापळा रचून संबंधित वायरमनला 5 हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.
46 वर्षीय तक्रारदाराच्या घराचा वीज मीटर मागील मालकाच्या नावावर होता. सद्यस्थितीत मीटर बदलण्याची प्रक्रिया सुरू असताना, महावितरणचा कंत्राटी वायरमन भूषण शालिग्राम चौधरी (वय 37, प्रभात कॉलनी कक्ष, जळगाव) यांनी मीटरचे सील तुटल्याचे सांगून तक्रारदारास धमकावले. त्यांनी आरोप केला की मीटरशी छेडछाड झाल्यामुळे वीज चोरीचा गुन्हा दाखल होईल. हा गुन्हा टाळण्यासाठी तसेच मीटर टेस्टिंग रिपोर्ट 'ओके' देण्यासाठी त्यांनी 15 हजारांची लाचेची मागणी केली.
या प्रकाराविरोधात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार केली. त्यानंतर विभागाने पडताळणी केली असता, चौधरी यांनी पंचासमक्ष 5 हजार रुपयांची मागणी करत रक्कम स्वीकारली. यावर सापळा कारवाई करून त्यांना रंगेहात पकडण्यात आले.
भूषण चौधरी यांच्याविरुद्ध रामानंद नगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस उप अधीक्षक श्री. योगेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. सापळा पथकात सफौ सुरेश पाटील, पोहेकॉ. सुनील वानखेडे, पोकाॅ. अमोल सूर्यवंशी यांनी सहभाग घेतला.
टिप्पणी पोस्ट करा