छत्रपती संभाजीनगर, निखिल वाणी I शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी कारवाई करत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) महसूल सहाय्यक दिलीप त्रिभुवन याला लाच घेताना रंगेहाथ अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रोडवर करण्यात आली.
प्राप्त माहितीनुसार, रहिवासी जिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या कार्यालयात एका नागरिकाच्या जमिनीचे वर्ग एक मध्ये रूपांतरण करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागण्यात आली होती. सदर लाचेची मागणी महसूल सहाय्यक त्रिभुवन याने केली होती. तक्रारदाराने ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्यानंतर सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे पैसे देताना त्रिभुवन याला ACB च्या पथकाने रंगेहाथ पकडले.
ही घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ उडाली आहे. लाच मागणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत उच्च अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. सदर प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, आणखी कोणी अधिकारी या प्रकरणात सामील आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.
या कारवाईमुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनातील पारदर्शकतेबाबत जनतेमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा