जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I धुळे जिल्ह्यातील बारीपाडा गावाचे शाश्वत विकासाचे प्रयोग आणि गावाच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले कार्य, यासाठी पद्मश्री मा. चैत्रामजी पवार यांचा सन्मान नुकताच जळगाव येथील नूतन मराठा महाविद्यालयात करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. रणजीत चव्हाण आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख उपस्थित होते.
सत्कार सोहळ्यात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल.पी. देशमुख यांच्या हस्ते पद्मश्री चैत्राम पवार यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी डॉ. रणजीत चव्हाण यांनी "चालते बोलते विद्यापीठ म्हणजे चैत्रामजी पवार" असे शब्दात त्यांचा गौरव केला आणि त्यांना स्वतःचे अनुभव सांगून बारीपाडा गावाच्या व पद्मश्री पवार यांच्या कार्याचे महत्त्व सांगितले. यामुळे उपस्थितांमध्ये बारीपाडा गाव आणि पवार साहेबांच्या कार्याविषयी उत्सुकता निर्माण झाली.
कार्यक्रमाच्या प्रारंभात पद्मश्री चैत्राम पवार यांच्या कार्यावर आधारित एक माहितीपट दाखविण्यात आला. यामध्ये त्यांनी बारीपाडा या छोट्या आदिवासी गावाला आंतरराष्ट्रीय स्तरावर कसे ओळख मिळवून दिली, याचे सुस्पष्ट चित्र उपस्थितांना दिले.
सत्काराला उत्तर देताना पद्मश्री पवार यांनी सांगितले की, "मी उच्चशिक्षित असूनही नोकरी न पत्करता, घरच्यांचा विरोध पत्करून मी गावाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित केले." त्यांनी गावातील आणि घरातील लोकांची मने वळवून त्यांना या कार्यात सहभागी केले. 'जल, जंगल, जमीन, जन, जनावरे' या पंचसूत्रींच्या मदतीने आणि अनेक अडचणींना सामोरे जात बारीपाडा गावाला आदर्श गाव बनवले. त्यांच्या या कार्यात त्यांना विरोधकांचा सामना देखील करावा लागला, परंतु त्यांनी आपले कार्य अव्याहतपणे चालू ठेवले.
सत्कार कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शितल पाटील यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. तेजल पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. के.बी. पाटील, उपप्राचार्या एम.एस. पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. संजय पाटील, प्रा. इंदिरा पाटील, प्रा. ललिता हिंगोणेकर, प्रा. आर. चव्हाण, प्रा. एन.जे. पाटील, प्रा. राकेश गोरसे, प्रा. बाळासाहेब सूर्यवंशी, प्रा. डॉ. मंगला तायडे, प्रा. वंदना पाटील, प्रा. सुनील गरुड यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका आणि विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.
टिप्पणी पोस्ट करा