भरधाव ट्रकने दुचाकीला धडक; जखमी महिला जिल्हा रुग्णालयात रुग्णालयात दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
शहरातील आकाशवाणी चौकात गुरुवारी (६ मार्च) सायंकाळी पाच वाजता झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा हात आणि पायाचा पूर्णतः चेंदामेंदा झाला. रागीनी चंपालाल पाटील (वय ४५, रा. साईनगर, भुसावळ) असे जखमी महिलेचे नाव असून, त्यांचे पती किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर महिलेला तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार रागीनी पाटील आपल्या पतीसोबत दुचाकी (एमएच १९ डीपी २४६७) ने आकाशवाणी चौकातून जात होत्या. यावेळी भुसावळहून पाळधीकडे जाणाऱ्या भरधाव ट्रकने (सीजी ०४ एलडब्ल्यू १२९९) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत रस्त्यावर पडल्याने महिलेचा एका हात आणि एका पायाचा चेंदामेंदा झाला. त्यांचे पती किरकोळ जखमी झाले.
अपघातानंतर चौकात मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच जिल्हापेठ आणि रामानंदनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक रोखली. दरम्यान, गंभीर जखमी महिलेला खासगी वाहनाने तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. मात्र, या घटनेबाबत पोलिस ठाण्यात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही. या अपघातामुळे शहरात वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण असून, चौकातील वाहतूक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
टिप्पणी पोस्ट करा