जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील मेहरूण तलाव बगीचा उद्यान परिसरातून गांजा ची विक्री करतांना एकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून ९ किलो ५२२ ग्रॅम गांजा व होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे. या मालाची एकूण किंमत १ लाख ७ हजार १३२ रुपये असल्याची माहिती मिळाली. त्याच्याविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीवरून जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनमधील पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली की, एक व्यक्ती मेहरुण बगीचा परिसरात गांजा विक्रीसाठी फिरत आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक पथक तयार करून पथकाने मेहरुण बगीचा येथील शिवाजी महाराज उद्यानात शोध घेतला. यावेळी आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या ताब्यातून गांजाची गोणी व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे. मुकेश विष्णू अभंगे (वय 43, रा. कंजरवाडा, तांबापूर, जळगाव) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस नाईक प्रदीप चौधरी यांच्या तक्रारीवरून एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलीस उपनिरीक्षक सचिन नवले, पोलीस कॉन्स्टेबल चेतन पाटील या प्रकरणाचा तपास करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
पोलिसांचे आवाहन
एमआयडीसी पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, जर कोणालाही बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांची विक्री करताना आढळल्यास त्यांनी त्वरित एमआयडीसी पोलीस स्टेशनला माहिती द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाईल.
टिप्पणी पोस्ट करा