चोपडा तालुक्यातील पोलिसांवर हल्ला, पोलीस कर्मचाऱ्यांना बांधून केली मारहाण, मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने झाली पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I चोपडा तालुक्यातील उमर्टी गावाजवळ मध्यप्रदेश सिमेवर शनिवारी सायंकाळी पोलिसांवर हल्ल्याची घटना घडली. पोलिसांनी अवैध बंदूक विक्रीविरोधी कारवाईसाठी एका संशयिताला ताब्यात घेतल्यानंतर, काही लोकांनी त्यांचे पथक अडवले आणि त्यांच्यावर हल्ला केला. या घटनेत एक पोलिस कर्मचारी बांधून ठेवण्यात आला, तर इतर कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली.
चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक आणि तीन कर्मचारी अवैध बंदूक विक्रीच्या विरोधात कारवाई करण्यासाठी उमर्टी गावाजवळ गेले होते. कारवाईच्या दरम्यान, पथक परत येत असताना काही स्थानिकांनी त्यांना अडवले. त्यावेळी बाचाबाची झाल्यावर, एका पोलिस कर्मचारीला बंदूकीचा धाक दाखवत त्याला पकडले, तर इतर पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलीस ठाण्याने तातडीने स्थानिक प्रशासनाला कळवले. जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली, अन्य वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी पोहचले. मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने, रात्री ९ वाजता त्या पोलिस कर्मचार्याची सुरक्षित सुटका करण्यात पोलिसांना यश आले.
या घटनेची पोलीस अधिक तपास करत आहेत आणि संशयितांविरुद्ध कडक कारवाईची तयारी करत आहेत. घटनास्थळी असलेल्या सर्व आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा