Top News

ब्रेकिंग: राजमल लखीचंद ज्वेलर्स कंपनीच्या १.६९ कोटींच्या मालमत्तेवर ईडीची धाड

ईडीच्या तपासानुसार, कंपनीच्या प्रवर्तकांनी बोगस नावांचा वापर करून मालमत्तांची खरेदी केली असून, बँक फसवणूक व मनी लॉन्ड्रिंगचा आरोप

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I अंमलबजावणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) ने १२ फेब्रुवारी २०२५ रोजी राजमल लखीचंद ज्वेलर्स कंपनीच्या जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमधील १.६९ कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेवर जप्ती केली आहे. ही कारवाई मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (PMLA), २००२ अंतर्गत करण्यात आली आहे, आणि या प्रकरणात कंपनीच्या प्रमुख आणि इतर संबंधित व्यक्तींविरुद्ध बँक फसवणुकीच्या आरोपावर तपास सुरू आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, कंपनीच्या प्रवर्तकांनी बोगस नावांचा वापर करून या मालमत्तांची खरेदी केली. कंपनीने बनावट कागदपत्रांद्वारे बँकांशी आर्थिक व्यवहार केले आणि कर्जाच्या रकमेतून त्यामधून स्थावर मालमत्तांमध्ये गुंतवणूक केली. या संदर्भात, सीबीआयने भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली एफआयआर नोंदवले आहेत. कंपनी आणि तिच्या संचालकांवर क्रिमिनल कॉन्स्पिरसी, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, आणि आर्थिक गैरव्यवहार याचे आरोप आहेत. या फसवणुकीमुळे स्टेट बँक ऑफ इंडियाला ३५२.४९ कोटी रुपये (व्याजासह) नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

ईडीच्या तपासात असे आढळून आले आहे की, प्रवर्तकांनी बनावट आर्थिक विवरण सादर करून कर्ज घेतले आणि आर्थिक विवरणांची फेरफार केली. यामध्ये शेल कंपन्यांचा वापर करून बोगस विक्री-खरेदी व्यवहार करण्यात आले. त्याचप्रमाणे, कर्जाच्या गहाण मालमत्तांवर बँकेची परवानगी न घेता विक्री केली गेली. तपासात महत्त्वाचे डेटा नष्ट करण्याचेही प्रयत्न झाल्याचे ईडीने सांगितले आहे.

ऑगस्ट २०२३ मध्ये ईडीने राजमल लखीचंद समूहाच्या १३ ठिकाणी छापे टाकले होते. त्यावेळी २४.३६ कोटी रुपये किमतीचे सोनं, चांदी, हिरे आणि १.१२१ कोटी रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. छापेमारीदरम्यान बोगस संचालक, शेल कंपन्या, आणि अन्य बोगस डोक्यांच्या वापराचे पुरावे मिळाले होते. त्यानंतर, १३ ऑक्टोबर २०२३ रोजी ३१५.६० कोटी रुपये किमतीच्या मालमत्तेवर तात्पुरती जप्ती केली गेली होती.

ईडीने २६ जून २०२४ रोजी विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले, आणि त्याची दखल २६ जुलै २०२४ रोजी न्यायालयाने घेतली. तपास अजूनही सुरू असल्याची माहिती ईडीने दिली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने