Top News

दोन कंपन्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या टोळींना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक

एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल 

जळगाव अपडेट न्यूज निखिल वाणी I पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये घरफोडी करणाऱ्या दोन टोळींना अटक केली असून, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही चोरी साई प्रेरणा इंडस्ट्रीज आणि महालक्ष्मी पुणी एक्झिम या कंपन्यांमध्ये घडली होती.

साई प्रेरणा इंडस्ट्रीज कंपनीतून तांब्याचे व अल्युमिनियमचे वायरिंग, इलेक्ट्रिक मोटर फिट कंट्रोलर, लोखंडी पॅनल, लोखंडी बीम रोल, गेअर बॉक्स ट्रांसफार्मर, आणि ३० भरलेल्या वर्जिन दाण्यांच्या बॅगा अशी एकूण तीन लाख तीन हजार रुपयांची चोरी झाली होती. यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी उमेश उर्फ भावड्या संतोष राजपूत (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव), आकाश सुरेश शिंदे (रा. साईनगर, कुसुंबा) आणि पृथ्वीराज उर्फ बऱ्या बच्चन बागडे यांना 9 फेब्रुवारी रोजी त्यांच्या घरातून अटक केली. त्यांच्या ताब्यातून एक लाख 11 हजार पाचशे रुपयांचे मुद्देमाल जप्त करण्यात आले.

दुसऱ्या घटनेत महालक्ष्मी पुणी एक्झिम कंपनीत चोरी करणाऱ्या प्रकाश उर्फ गिड्डा राठोड आणि गोविंदा उर्फ लंबा देविदास ढालवाले या दोघांना 10 फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 22 हजार रुपये जप्त करण्यात आले असून, तिसऱ्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे.

पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी चोरीच्या गुन्ह्याचा उलगडा करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, योगेश घुगे आदींनी ही कारवाई केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने