Top News

कुसुंब्यात दुर्दैवी घटना: भरधाव रिक्षाच्या धडकेत वृद्ध पुजारी ठार


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव जिल्ह्यातील कुसुंबा येथे सोमवारी (दि. २४) सकाळी ११.३० च्या सुमारास एका दुर्दैवी घटनेत वृद्ध पुजारी मनोहर बाबुराव जोशी (वय ८१) यांचा अपघाती मृत्यू झाला. गोशाळेजवळून पायी जात असताना एका अज्ञात भरधाव रिक्षाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. या घटनेत ते गंभीर जखमी झाले आणि उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

मनोहर जोशी हे कुसुंबा येथील साई सिटी कॉलनीत आपल्या कुटुंबासोबत राहत होते. ते गावातील शंकर पार्वती मंदिरात पुजारी म्हणून अनेक वर्षांपासून सेवा करत होते. सोमवारी सकाळी ते गोशाळेजवळून चालले असताना हा अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने त्यांना मागून धडक दिली आणि चालक घटनास्थळावरून पसार झाला.

ग्रामस्थांनी तातडीने जोशी यांना जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे जोशी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

महाशिवरात्रीच्या आधीच घडलेल्या या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. जोशी हे शांत आणि मनमिळावू स्वभावाचे होते. त्यांच्या निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

एमआयडीसी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करत आहेत. अज्ञात रिक्षाचालकाचा शोध सुरू आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने