Top News

दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, मुख्याध्यापिकांसह तिघांवर गुन्हा दाखल



जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I यावल तालुक्यातील किनगाव येथील नेहरू माध्यमिक विद्यालय केंद्रावर दहावीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरदार वल्लभभाई पटेल स्कूलच्या मुख्याध्यापिका शीला तायडे, शिक्षक अमोल भालेराव आणि आशा युसूफ पटेल या तिघांनी मिळून विद्यार्थ्यांना कॉपी पुरवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी यावल पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले?
सोमवारी (दि. 4) सकाळी दहावीच्या मराठी द्वितीय व तृतीय विषयाचा पेपर सुरू होता. त्यावेळी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांना माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांचा फोन आला. मनोज राणे यांच्या ऑटो रिक्षात मुख्याध्यापिका शीला तायडे, शिक्षक अमोल भालेराव आणि आशा युसूफ पटेल हे नवनीत अपेक्षित प्रश्नसंचातून प्रश्नोत्तरे पाहून कॉपी बनवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, असे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले. या माहितीच्या आधारे गटशिक्षणाधिकारी धनके यांनी या प्रकरणाची चौकशी केली. चौकशीत हा प्रकार खरा असल्याचे निष्पन्न झाले.

गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
गटशिक्षणाधिकारी धनके यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसांनी मुख्याध्यापिका शीला तायडे, शिक्षक अमोल भालेराव आणि आशा युसूफ पटेल यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास यावल पोलीस करत आहेत.

या घटनेमुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ
या घटनेमुळे शिक्षणक्षेत्रात खळबळ उडाली आहे. दहावीसारख्या महत्त्वाच्या परीक्षेत कॉपी पुरवण्याचा प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने