एएमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहरातील अजिंठा चौफुली येथे अवैधपणे बायोडिझेलची वाहतूक करणाऱ्या दोन टँकरवर एमआयडीसी पोलिसांनी मोठी कारवाई केली. मंगळवारी रात्री २ वाजता पोलिस पथकाने गस्तीवर असताना संशयास्पद रीतीने जाणारे दोन टँकर थांबवले आणि त्यांच्यावर चौकशी केली.
चालकांची उडवाउडवीची उत्तरे
तपासणी दरम्यान, दोन्ही टँकरचे चालक पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत होते. यावरून पोलिसांनी संशय घेत त्वरित दोन्ही टँकर ताब्यात घेतले. पोलिसांनी तात्काळ तपासणी केली असता, त्यात दोन्ही टँकरमध्ये बायोडिझेल भरलेले आढळले.
२७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी या दोन्ही वाहने (जीजे १२ बीटी ११८१ आणि जेजे १२ बीटी ४२८४) एमआयडीसी पोलिस ठाण्यात आणली आणि त्यांची अधिक तपासणी केली. यावेळी दोन्ही वाहनांमध्ये मिळून एकूण २७ लाख रुपये किमतीचे बायोडिझेल आढळून आले.
गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू
यासंदर्भात पोलिस नाईक विकास सातदिवे आणि सिद्धेश्वर डापकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन चालकांसह त्यांच्या टँकर मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालकांमध्ये सद्दाम सय्यद अकबर (वय २३, बच्छाव, गुजरात) आणि लतीफ फकीर मोहम्मद हिंगोरजा (वय २४, आडेचार, जि. कच्छ, गुजरात) यांचा समावेश आहे. तसेच टँकरचे मालक ज्ञानेश्वर भारत शेजोळे (वय २१, उकडी, ता. बुलढाणा) आणि सुलेमान इलियास छेरेया (वरसाना, गुजरात) यांच्याही विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल तायडे आणि चंद्रकांत धनके यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. या घटनेनंतर अवैध बायोडिझेल व्यवसायावर कडक कारवाई होणार असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा