पोलीसांनी ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल; चोपड्यातून विकत घेतले होते गावठी पिस्तूल.
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I वरणगाव शहरातील रेल्वे स्टेशन रोडवर असलेल्या महात्मा गांधी विद्यालयाजवळ गावठी पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूसासह दोन जणांना वरणगाव पोलीसांनी गुरूवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता कारवाई करत अटक केली. याप्रकरणी पोलीसांनी ९९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, आरोपींच्या विरोधात वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वरणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांना गोपनीय माहिती मिळाली की, दोन व्यक्ती बुलेट मोटरसायकलवर गावठी पिस्तूल घेऊन दहशत निर्माण करत आहेत. यानंतर पोलीस पथकाने कारवाईची योजना आखली. गुरूवारी १३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता पोलिसांनी छापा टाकला आणि संशयित आरोपी आदेश ज्ञानेश्वर भैसे (वय १९, आंबेडकरनगर, वरणगाव) आणि गौरव संतोष इंगळे (वय २०, वामन नगर, वरणगाव) यांना अटक केली. त्यांच्याकडून गावठी पिस्तूल, जिवंत काडतूस आणि बुलेट मोटारसायकल (क्र. एम. 12. डी. एन. 9097) असा एकूण ९९ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
तपासात आदेश भैसे याने सांगितले की, त्याने आणि सोनू सुनील भालेराव यांनी सुमारे एक महिन्यापूर्वी चोपडा येथून सागर नावाच्या व्यक्तीकडून २० हजार रुपयांमध्ये गावठी पिस्तूल विकत घेतले होते. पोलीस कॉन्स्टेबल गोपीचंद शेनफडू सोनवणे यांच्या फिर्यादीवरून दोघांवर वरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपासाची पुढील कारवाई सहाय्यक फौजदार नागेंद्र सिताराम तायडे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.
टिप्पणी पोस्ट करा