आगीमुळे दोन्ही कुटुंबांचा संसार जळून खाक, ग्रामस्थांची मदत आणि नुकसान भरपाईची मागणी
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I एरंडोल तालुक्यातील तळई येथील गोकुळ उद्धव महाजन आणि दादाजी उद्धव महाजन या दोन्ही सख्ख्या भावांच्या घराला १६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री २:३० ते ३:०० वाजेच्या दरम्यान भीषण आग लागली. आगीमुळे दोन्ही घरं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत, ज्यामुळे दोन्ही कुटुंबांचा संसार उघड्यावर आला आहे. या दुर्घटनेत जीवितहानी टळली असली तरी, दोन्ही कुटुंबांचा सर्व संसार जळून खाक झाला आहे.
सविस्तर माहिती अशी की, रात्री घरातील सदस्यांना घरात झालेल्या धुरामुळे अचानक जाग आली. तात्काळ गावकऱ्यांनी आगीची माहिती मिळाल्यावर मदतीसाठी धाव घेतली, परंतु घराला लागलेली आग इतकी भयंकर होती की, त्यावर नियंत्रण ठेवणे शक्य झाले नाही. आगीने अत्यंत रौद्र रूप धारण केले होते आणि आटोक्यात येईपर्यंत दोन्ही घरे पूर्णपणे जळून खाक झाली. घरातील सर्व साहित्य, जीवनावश्यक वस्तू आणि इतर सामानही जळून नष्ट झाले.
या घटनेत दादाजी महाजन यांचा मुलाच्या शैक्षणिक कागदपत्रांसह लॅपटॉप देखील जळून खाक झाला. घरातील सर्व गोष्टी नष्ट झाल्या असून, या कुटुंबासाठी मोठा आर्थिक फटका बसला आहे. दोन्ही कुटुंबांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून, त्यांचा संसार आता उघड्यावर आलेला आहे. त्यांच्या डोक्यावरचे छत गेले असून, अंगावरचे कपड्यांशिवाय त्यांच्याजवळ काहीही शिल्लक राहिले नाही.
ग्रामस्थांकडून लोकप्रतिनिधी आणि शासनाकडे सहानुभूतीपूर्वक विचार करून या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा