जळगाव शहराच्या नागरिकांसाठी बस सेवा करण्याच्या संदर्भात सकारात्मक पाऊल, महापालिकेच्या आयुक्तांनी दिले आश्वासन
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जळगाव शहर महानगरपालिकेने प्रस्तावित ई-बस सेवेच्या संदर्भात नागरिकांची सूचना व हरकती मागविण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यावर प्रतिक्रिया देत श्री साई धाम मंदिर कोल्हे हिल्स परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त श्याम गोसावी यांची भेट घेऊन आपल्या परिसरासाठी बस सेवा सुरु करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
श्री साई धाम मंदिर परिवाराने दिलेल्या निवेदनात मागणी केली आहे की, मार्ग क्रमांक १५ चा विस्तार करून जळगाव शहर जुने बस स्थानक ते संत गाडगे बाबा चौक मार्गे कोल्हे हिल्स पर्यंत बस सेवा सुरू केली जावी. मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात वस्ती वाढली असून, येण्या-जाण्यासाठी नागरिकांना वाहनांची व्यवस्था नसल्याचा मुद्दा तेव्हा उपस्थित करण्यात आला. यावर श्याम गोसावी साहेब यांनी या प्रस्तावावर सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केली, कोल्हे हिल्सपर्यंत ई-बस सेवा सुरू करण्यासाठी महापालिकाकडून आवश्यक प्रयत्न केले जातील. तसेच, गोसावी यांनी महापालिकेच्या परिवहन विभागाचे प्रमुख योगेश वाणी यांना तात्काळ सूचनेचा आदेश देऊन या बाबतीत त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. यावेळी निवेदन सादर करताना श्री साई धाम मंदिर परिवाराचे अध्यक्ष जितू भाऊ करोसिया, उपाध्यक्ष भूषण पाटील, बापू भाऊ बागलाने, निलेश मोरे, महेंद्रसिंग पाटील, किरण खैरनार, पत्रकार प्रदीप दारकुंडे यांची उपस्थिती होती.
टिप्पणी पोस्ट करा