Top News

बहिणाबाई महोत्सवात रंगला मराठी संस्कृती जपणारा फॅशन शो


शाहीर मीरा दळवी व गायक रवींद्र खोमणे यांच्या कार्यक्रमांचा समावेश

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
शहरातील सागर पार्क मैदानावर आयोजित बहिणाबाई महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी एक आकर्षक फॅशन शो आयोजित करण्यात आला. या फॅशन शोमध्ये मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या महिलांनी भारतीय पारंपारिक पोशाखात रॅम्पवर वावरून उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. महिलांच्या मराठमोळ्या पोशाखामध्ये हळदी, लेंगा, मारवडी, गुजराती व मराठी प्रकारातील पेहराव सादर करण्यात आले. यामध्ये मुंबई, सुरत, पुणे, जळगाव येथील २५ मॉडेल्सनी सहभाग घेतला.

हा फॅशन शो साज मेकअप स्टुडिओ यांच्या संकल्पनेतून साकारला गेला. कार्यक्रमात सहभागी स्पर्धक व विजेत्यांना आकर्षक क्राउन व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. यासाठी अर्चना जाधव यांनी सहकार्य केले.  

महोत्सवाच्या दुसऱ्या प्रमुख आकर्षणाचे आयोजन देखील शनिवारी सायंकाळी करण्यात आले. त्यात जळगावकरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती पाहायला मिळाली. सुट्टीचा दिवस असल्याने अनेकांनी सागर पार्क मैदानावर येत बचत गटांच्या स्टॉलला भेटी दिल्या. महोत्सवात सुक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकारच्या वतीने उद्योगांना चालना देण्यासाठी स्टॉल्स ठेवण्यात आले होते.  

कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून आमदार मंगेश चव्हाण, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उद्योगपती रजनीकांत कोठारी, नाबार्डचे जिल्हा व्यवस्थापक अमित तायडे, तहसीलदार शीतल राजपूत, डॉ. पी. आर. चौधरी, जिल्हा दूध संघाचे व्यवस्थापकीय संचालक शैलेंद्र मोरखेडे, बाळासाहेब सुर्यवंशी, रवींद्र लढ्ढा, अपर्णा भट, विनोद ढगे, सचिन महाजन, सागर पगारीया, मोहित पाटील, विक्रांत चौधरी, रितेश लिमडा, अक्षय सोनवणे, मंगेश पाटील, दीपक जोशी, साजीद पठाण आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या दरम्यान उद्योग, सामाजिक व वैद्यकीय क्षेत्रातील योगदानासाठी काही प्रमुख व्यक्तींचा सन्मान देखील करण्यात आला. पीतांबरी उद्योग समूह, सामाजिक क्षेत्रातील समर्पण प्रतिष्ठान अमरावती, भातृ मंडळ पुणे आणि वैद्यकीय क्षेत्रातील डॉ. परेश दोशी व डॉ. प्रीती दोशी यांना बहिणाबाई पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

आज, म्हणजेच रविवार, २६ जानेवारी २०२५ रोजी 'लावणी महाराष्ट्राची' व 'भारत गौरव पर्व' हे कार्यक्रम होणार आहेत. सायंकाळी शाहीर मीरा दळवी व त्यांच्या सहकाऱ्यांचा 'लावणी महाराष्ट्राची' कार्यक्रम तर प्रसिद्ध गायक रवींद्र खोमणे यांचा 'भारत गौरव पर्व' कार्यक्रम सादर होईल, अशी माहिती आयोजकांनी दिली आहे.

बहिणाबाई महोत्सव हा सागर पार्क मैदानावर चालू असलेल्या पाच दिवसीय महोत्सवाच्या भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, आणि यामध्ये विविध सांस्कृतिक, उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रांतील महत्त्वपूर्ण कार्यांचे प्रदर्शन केले जात आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने