Top News

खळबळजनक : पाचव्या मजल्यावरून पडून २८ वर्षीय मजूराचा जागीच मृत्यू

रामानंद नगर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद, कुटुंबात शोककळा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I २८ वर्षीय तरुण मजुराचा सोमवारी (दि. २७ जानेवारी) दुपारी २ वाजेच्या सुमारास रायसोनी नगर येथील एका अपार्टमेंटच्या बांधकामावरून पाचव्या मजल्यावरून पडल्याने मृत्यू झाला. मयत मजुराचे नाव ज्ञानेश्वर श्रावण राठोड (वय २८, रा. कुसुंबा, ता. जळगाव) आहे.

ज्ञानेश्वर आपल्या कुटुंबीयांसह कुसुंबा गावात राहत होता. तो एक सक्षम कामगार म्हणून बांधकामावर मजूरी करत होता आणि आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. सोमवारी तो इतर मजूर मित्रांसह रायसोनी नगरातील एका अपार्टमेंटच्या बांधकामावर काम करीत होता. पाचव्या मजल्यावर शिडीवरून चढून काम करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो खाली पडला.

घटनेची माहिती मिळताच, इतर मजुरांनी तात्काळ त्याला रिक्षात टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. तेथे तपासणी केली असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. या धक्कादायक घटनेने कुटुंबीयांसह परिसरात शोककळा पसरली आहे. विशेष म्हणजे, २२ दिवसांपूर्वी म्हणजेच ५ जानेवारी रोजी त्याचा वाढदिवस मित्रांसोबत उत्साहात साजरा करण्यात आला होता.

कुटुंबीयांनी या घटनेबद्दल जोरदार आक्रोश व्यक्त केला आहे. त्याच्या निधनामुळे कुसुंबा गावात शोककळा पसरली असून, या प्रकरणी रामानंद नगर पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने