सामान्य नागरिकांना त्रास देणाऱ्या निरीक्षकांवर कारवाईची मागणी
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या कार्यकाळातील पोलिस निरीक्षकांचे दुर्लक्ष व सामान्य नागरिकांना त्रास देण्याच्या आरोपावरून जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आली आहे. जळगाव ग्रामीण विधानसभा निवडणूक प्रमुख चंद्रशेखर अत्तरदे आणि मारहाण झालेल्या प्रवीण अशोक महाजन यांनी एकत्रितपणे पोलिस अधीक्षकांना निवेदन सादर केले आहे.
घटनेनुसार, 31 डिसेंबर रोजी प्रवीण महाजन (33, रा. गणेश कॉलनी) हे कामानिमित्त जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गेले होते. त्यावेळी त्यांनी पोलिस निरीक्षक राजेश मानगावकर यांना कॉल केला असता, त्यांना शिवीगाळ करण्यात आली आणि पोलिस ठाण्यात मारहाण करून तीन तास डांबून ठेवण्यात आले, असा आरोप प्रवीण महाजन यांनी केला आहे. यामुळे पोलिस निरीक्षकांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात अत्तरदे व महाजन यांनी पुढे म्हटले आहे की, जिल्हा पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात टवाळखोर मुले विद्यार्थ्यांना मादक पदार्थ विकत असल्याचा आणि त्यांना व्यसन लागवण्याचा आरोप आहे. तसेच, भजे गल्लीतील हॉटेलमध्ये अवैधरित्या दारु विक्री होण्याचे तसेच काही ठिकाणी कंटणखाने सुरू असण्याची माहिती दिली आहे.
याव्यतिरिक्त, पोलिस निरीक्षकांवर आणि पोलिस ठाण्याच्या व्यवस्थेवर गंभीर आरोप करणारे निवेदन दिले असून, हे दुर्लक्ष केल्याने सामान्य नागरिकांना त्रास होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर, जर पोलिस निरीक्षकांवर कारवाई केली गेली नाही, तर ४ जानेवारी रोजी पोलिस अधीक्षक कार्यालयासमोर उपोषण सुरू करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
ही बाब गंभीर असून, पोलिस निरीक्षकांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणि पोलिसांच्या कामकाजात सुधारणा घडवण्यासाठी त्वरित कार्यवाहीची आवश्यकता आहे.
टिप्पणी पोस्ट करा