पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन; सांस्कृतिक कार्यक्रम, स्पर्धा व "चला हवा करुया" विनोदी कार्यक्रमाचे आयोजन.
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील सागर पार्क येथे बहिणाबाई महोत्सवाची सुरुवात गुरुवारी भव्य दिव्य समारोहाने झाली. पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्या हस्ते बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
या महोत्सवात खान्देशातील विविध लोककला, शाहीरी पोवाडा, देशभक्तीपर गीते, वहीगायन, भावगीते आणि मराठी संस्कृतीचा फॅशन शो यासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येणार आहेत.
या महोत्सवात शालेय आणि महाविद्यालयीन कलावंत पाच दिवस आपल्या कला सादर करणार आहेत. तसेच, खाद्यपदार्थ आणि विविध गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स देखील उभारण्यात आले असून पहिल्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद पाहायला मिळाला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला खेळ पैठणीचा, रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आणि मेहंदी स्पर्धा आयोजित करण्यात आल्या. पोलीस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उद्योगपती रजनीकांत कोठारी, भालचंद्र पाटील, शैलेश मोरखडे, मनोहर पाटील, प्रशांत कोठारी, कुशल गांधी, सपन झुनझुनवाला, सेवानिवृत्त अधीक्षक कृषी अधिकारी अनिल भोकरे, बाळासाहेब सुर्यवंशी, शैला चौधरी, सचिन महाजन, मोहित पाटील, सागर पगारीया, अक्षय सोनवणे, रितेश लिमडा, कृष्णा चव्हाण, आकाश भावसार, अभिषेक बोरसे, विक्रांत चौधरी, मंगेश पाटील यांची उपस्थिती होती.
सुत्रसंचलन विनोद ढगे यांनी तर दीपक परदेशी यांनी प्रास्ताविक केले. विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके वितरण करण्यात आली, तसेच स्थानिक कलाकारांनी आपल्या कलांचे सादरीकरण केले.
आयोजकांनी सांगितले की, उद्यापासून विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना आणि संस्थांना बहिणाबाई पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
आज सायंकाळी, "चला हवा करुया" विनोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री श्रेया बुबडे आणि अभिनेते कुशल बद्रीके आपल्या विनोदी अभिनयाने उपस्थितांना हसवतील. कार्यक्रम संध्याकाळी सात वाजता सुरू होईल.
बहिणाबाई महोत्सव हा सांस्कृतिक दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार असून, यामध्ये सहभागी होऊन स्थानिक कलेचा आनंद घेता येईल.
टिप्पणी पोस्ट करा