तालुका पोलीस स्थानकात संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I शहरातील खोटे नगर स्टॉपजवळ एक धक्कादायक घटना घडली असून एका पाणीपुरी विक्रेत्यावर लोखंडी कोयत्याचा धाक दाखवून त्याच्याजवळून २ हजार रुपये लुटून नेल्याची घटना घडली. तसेच आरोपींनी त्याच्यावर लाथाबुक्क्यांचा मारा करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस स्थानकात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गौतम हकिमचंद यादव (वय २८, रा. खोटेनगर, जळगाव) हा तरूण शनिवारी सायंकाळी खोटे नगर स्टॉपजवळ पाणीपुरी विक्री करत होता. यावेळी गोपाल राजपूत, दादू कोळी, सागर राजपूत व गोलू पाटील (सर्व रा. जळगाव) हे चौघेजण त्याच्याकडे आले. दादू कोळी याने हातात लोखंडी कोयता घेत गौतमला धमकावत त्याच्याजवळून २ हजार रुपये जबरी काढून घेतले. त्यानंतर उर्वरित आरोपींनी गौतमवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यातूनही समाधान न मानता एका आरोपीने लाकडी दांडकाने गौतमला मारहाण करून त्याला गंभीर दुखापत केली. गौतम आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागला. मात्र, आरोपी दादू कोळी त्याचा पाठलाग करत त्याला जीवे मारण्याची धमकी देत होता. या घटनेची माहिती मिळताच गौतमने जळगाव तालुका पोलीस स्थानकात धाव घेतली, फिर्यादी गौतम यादव याने चौघांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे. आरोपींना अटक करण्यासाठी पोलिसांनी शोध सुरू केला आहे. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. एका निर्दोष पाणीपुरी विक्रेत्यावर अशा प्रकारे अत्याचार करण्यात आल्याने नागरिकांमध्ये रोष व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करून आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. या घटनेमुळे शहरात सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. रात्रीच्या वेळी एकटे फिरणाऱ्या नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी शहरात सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची गरज आहे.
टिप्पणी पोस्ट करा