Top News

ब्रेकींग : जळगाव एमआयडीसी कंपनीत भीषण आग, जीवितहानी टळली

अग्निशमन दलाचे चार ते पाच बंब लागूनही आग आटोक्यात नाही

जळगाव अपडेट न्यूज,  निखिल वाणी । शहरातील एमआयडीसीतील चटई कंपनीत आज भीषण आग लागली. या आगीत कंपनीतील महत्त्वपूर्ण साहित्य जळून खाक झाले, परंतु सुदैवाने जीवितहानी टळली. आग लागल्यानंतर, अग्निशमन दलाच्या चार ते पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतरही आग पूर्णपणे आटोक्यात आणता आलेली नाही.

आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु घटनास्थळी पोलिस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी सक्रिय झाले आहेत. आग लागलेल्या कंपनीत चटईला लागणारे केमिकल्स व इतर ज्वालाग्राही वस्तू असल्याने आग आटोक्यात आणणे कठीण होत आहे. परंतु, त्याच वेळी कर्मचार्‍यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी टाळता आली आहे.

एमआयडीसी परिसरात उमेश यशवंत चौधरी रा.सन्मित्र कॉलनी यांच्या मालकीची डी सेक्टरमध्ये सिद्धिविनायक इंडस्ट्रीज नावाची चटई कंपनी आणि सूर्यफूल गोडावून आहे. रविवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास कंपनीत सुरक्षारक्षकाच्या खोलीत अचानक आग लागली. कंपनीत तयार चटई आणि प्लास्टिक दाणे कच्चा माल असल्याने आग लागलीच पसरली. 

काही वेळातच संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. आग विझवण्यासाठी जळगाव अग्निशमन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी बंब घेऊन पोहचले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, तासाभरात ४ ते ५ बंब संपले असून अद्यापही आग आटोक्यात येण्याची लक्षणे दिसत नाही. काही वेळापूर्वी कंपनीत एक गॅस सिलेंडरचा देखील स्फोट झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल भवारी, शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक राहुल गायकवाड यांच्यासह कर्मचारी लक्ष ठेवून आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने