जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I गिरणा पंपिंग प्लांटमधून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पाईप चोरणाऱ्यांना मनपा कर्मचाऱ्यांनी रंगेहाथ पकडले होते. यातील सहावा संशयित, महानगर पालिकेचे माजी विरोधीपक्ष नेते सुनिल सुपडू महाजन यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. यासाठी तालुका पोलीस ठाण्याचे पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिली.
२ डिसेंबर रोजी गिरणा पंपिंग प्लांटमधून शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जुन्या पाणीपुरवठा योजनेचे पाइप जेसीबीद्वारे काढून नेत असताना मनपा कर्मचाऱ्यांनी संशयितांना रंगेहाथ पकडले होते. यावरून तालुका पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. चौकशीमध्ये त्या पाच संशयितांनी सांगितले की, हे पाईप काढण्याचे काम सुनिल महाजन यांच्या सांगण्यावरून करण्यात आले होते. त्यामुळे या प्रकरणात महाजन यांचे नाव समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांना सहावे संशयित म्हणून समाविष्ट केले.
सुनिल महाजन यांचे नाव प्रकरणात समोर येताच त्यांचा शोध घेण्यासाठी तालुका पोलिसांसह एमआयडीसी पोलिसांचे पथक सक्रिय झाले आहे. मंगळवारी दोन वेळा पोलिसांचे पथक महाजन यांच्या घरी गेले होते, मात्र ते त्याठिकाणी आढळले नाहीत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाजन हे पसार झाले आहेत आणि त्यांचा शोध सुरू आहे. बुधवारी देखील महाजन मिळून आले नसल्यामुळे तालुका पोलिसांचे पथक त्यांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा