Top News

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर महोत्सव स्थगित, बचतगटांना आर्थिक फटका

राष्ट्रीय दुखवट्याच्या निर्णयामुळे २०० बचतगटांची तयारी निष्फळ, महिलांची नुकसान भरपाईची मागणी

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आल्यामुळे जळगाव शहरातील सागर पार्क येथे आयोजित खान्देश महोत्सव स्थगित करण्यात आला. मनपाच्या या निर्णयामुळे लाखो रुपयांची तयारी केलेल्या २०० बचतगटांना मोठा आर्थिक फटका बसला.

बचतगटांसाठी २७ ते ३१ डिसेंबर दरम्यान महोत्सव आयोजित करण्यात आला होता. महिलांनी रात्रीपासूनच खाद्यपदार्थ तयार करून महोत्सव स्थळी पोहोचले, मात्र त्यांना महोत्सव पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळाली. मनपाच्या आदेशानुसार महोत्सव राष्ट्रीय दुखवट्याच्या कारणाने स्थगित करण्यात आला.

या निर्णयामुळे संतापलेल्या महिलांनी आमदार सुरेश भोळे यांच्याकडे तक्रार केली. भोळे यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी चर्चा केली. जिल्हाधिकाऱ्यांनी मनपा आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे यांच्याशी संपर्क साधला, परंतु मनपा आयुक्तांनी महोत्सव रद्द करण्याचा निर्णय ठाम ठेवला. महिलांनी त्यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली, परंतु त्यावर कुठेही ठोस प्रतिसाद मिळाला नाही.

महिलांचा आरोप आहे की, "रात्रीच माहिती दिली असती तर आम्ही तयारी थांबवू शकतो होतो. हे नुकसान मनपाने भरून काढावे."

खान्देश महोत्सव आता ३ ते ७ जानेवारी २०२५ दरम्यान आयोजित केला जाईल, अशी माहिती मनपा आयुक्तांनी दिली आहे. यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, "राष्ट्रीय दुखवट्याच्या संदर्भातील केंद्रीय गृहमंत्रालयाच्या संहितेप्रमाणे निर्णय घेतला आहे, तरीही महोत्सवाच्या स्थगितीच्या निर्णयात महिलांना न्याय मिळावा."

बचतगटांच्या महिलांचा निषेध सुरू असून त्यांनी मनपाकडून न्याय आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने