Top News

जळगाव एसटी विभागात नवीन ई-बसेस व बीएस ६ डिझेल बसेसची येण्याची प्रतीक्षा

जळगाव विभागासाठी १७१ ई-बसेस मंजूर, पाच आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन तयार, दिवाळीत प्रवाशांची वाढलेली गर्दी, उत्पन्नात जळगाव विभागाला तिसरे स्थान,  ४०० नवीन बसेसची आवश्यकता, प्रवासी संख्येच्या वाढीमुळे एसटी ताफ्यात तुटवडा, चार्जिंग स्टेशन तयार, ई-बसेसच्या आगमनाची प्रतीक्षा

जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I राज्यातील एसटी महामंडळाने विविध विभागांमध्ये ई-बसेस दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जळगाव विभागाला १७१ ई-बसेस मंजूर झाल्या आहेत आणि त्यासाठी पाच आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आली आहेत. मात्र, या ई-बसेसची आगमनाची प्रतीक्षा जळगाव विभाग करत आहे. एसटी महामंडळ १२०० ई-बसेस आणि 'बीएस ६' डिझेल बसेस आपल्या ताफ्यात समाविष्ट करणार आहे. जळगाव विभागाला देखील या नवीन बसेस मिळणार आहेत, परंतु अद्याप ई-बसेस उपलब्ध झालेल्या नाहीत.

जळगाव विभागाच्या एसटी ताफ्यात ४०० नवीन बसेसची आवश्यकता आहे, कारण महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना दिल्या जात असलेल्या तिकीट सवलतीमुळे प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सद्यस्थितीमध्ये जळगाव विभागात ७१५ बसेस कार्यरत असून, प्रवासी संख्येच्या तुलनेत ४०० बसेसची आणखी आवश्यकता आहे.

दिवाळीच्या सणाच्या काळात, जळगाव विभागात प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. या काळात, जळगाव विभागाने पुणे मार्गावर जादा बसेस सोडल्या होत्या, ज्यात साध्या नियतकालीन गाड्यांसोबत शिवशाही बसेस देखील समाविष्ट होत्या. पुणे, मुंबई, आणि नागपूर सारख्या लांब पल्ल्याच्या मार्गांवर या बसेस सोडण्यात आल्या होत्या. यामुळे, जळगाव विभाग दिवाळीच्या सुट्टीत उत्पन्नाच्या बाबतीत तीन नंबरवर आला होता.

चार्जिंग स्टेशन संदर्भात, जळगाव, चोपडा, पाचोरा, चाळीसगाव आणि रावेर येथील पाच आगारांमध्ये चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आली आहेत. गेल्या दीड वर्षांपासून हे काम सुरु होते आणि किरकोळ काम वगळता सर्व कामे पूर्ण झाली आहेत. जळगाव विभागात प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असली तरी, ताफ्यातील बसेस कमी आहेत. या पार्श्वभूमीवर, ई-बसेस आणि बीएस ६ डिझेल बसेसच्या आगमनाची जळगाव विभागाला उत्सुकतेने वाट पाहत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने