Top News

ख्रिसमसच्या सुट्यांमध्ये विमान, रेल्वेचे तिकीट बुकिंग फुल्ल



 शिर्डी, शेगाव, तिरुपती बालाजीला देवदर्शन, तर पर्यटनासाठी गोव्याला पसंती


जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I
ख्रिस्ती बांधवांचा ख्रिसमस सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या सणानिमित्त इंग्रजी माध्यमांच्या शाळांना १० ते १५ दिवस सुट्टी असते, त्यामुळे अनेकजण पर्यटन किंवा देवदर्शनाला जाण्याचे नियोजन आधीच करतात. परिणामी, गेल्या दोन महिन्यांपासून सर्व प्रमुख मार्गांवरील रेल्वे गाड्यांचे तिकीट आरक्षण पूर्णपणे भरलेले आहे, तसेच गोवा आणि हैदराबादच्या विमान सेवा देखील जवळपास पूर्ण आरक्षित झालेल्या आहेत.

नाताळ सणाच्या सुट्यांमध्ये तसेच ३१ डिसेंबर साजरा करण्यासाठी नागरिक बाहेरगावी फिरण्याचे नियोजन करतात. यासाठी दोन ते तीन महिने आधीच कुटुंबासह फिरायला शिर्डी, शेगाव, तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी प्रवासाची तयारी केली जाते. यावर्षी शिर्डी, शेगाव आणि तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. रेल्वेने शिर्डी आणि शेगाव येथे जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. तसेच, तिरुपती बालाजीसाठी जळगाववरून हैदराबाद विमानसेवा सुरू झाल्याने विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढली आहे.

नागरिक स्वतःच्या वाहनाने, खासगी वाहनाने तसेच रेल्वेने प्रवास करण्यास पसंती देत आहेत. जळगाववरून सुरू असलेल्या विमानसेवेने नागरिकांना पर्यटन स्थळे आणि देवस्थानांवर जाण्यासाठी पर्याय उपलब्ध करून दिला आहे, ज्यामुळे या विमानसेवेच्या तिकीट बुकिंगचे प्रमाण देखील फुल्ल झाले आहे.

गोव्यासाठी विमान तिकीट बुकिंग पूर्णपणे फुल्ल
जळगाव, पुणे आणि हैदराबाद येथून गोव्यासाठी २२ डिसेंबर ते २ जानेवारी पर्यंतचे विमान तिकीट बुकिंग जवळपास पूर्णपणे भरले गेले आहे. जळगाववरून गोवा आणि हैदराबाद येथे जाणाऱ्यांची संख्या वाढली असून, ख्रिसमसच्या सुट्टीत तिकीट बुकिंगसाठी येणाऱ्यांची मोठी गर्दी आहे, अशी माहिती तिकीट बुकिंग एजंट आशिष पाटील यांनी दिली.

थर्टी फर्स्ट साजरे करण्यासाठी गोव्या पर्यंतचे प्रवास मोठ्या प्रमाणावर वाढले आहेत. वर्षाच्या शेवटी सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जळगाव शहरातून गोव्यासाठी प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. गोवा एक्स्प्रेस ही एकमेव गाडी जळगावहून गोव्यासाठी आहे, परंतु या गाडीचे तिकीट आरक्षण नेहमीच फुल्ल असते. त्यामुळे, पर्यटक मुंबईकडे जाऊन तेथून कोकणमार्गाने गोव्याला जात आहेत.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने