विद्यार्थ्यांच्या नृत्य, संगीत, गीत गायनाने पालक झाले मंत्रमुग्ध; शाळेच्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाचे होते साक्षात्कार
जळगाव अपडेट न्यूज, निखिल वाणी I गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलचा "एलेगेंझा २०२४" संगीत कन्सर्ट आणि सांस्कृतिक महोत्सव नुकताच मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सादर केलेले नृत्य, संगीत आणि गीत गायनाने उपस्थित पालकांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी सुप्रीम इंडस्ट्रीचे महाप्रबंधक ज्ञानदेव महाडिक, मिस एशिया मृणाली चित्ते, गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. उल्हास पाटील, सचिव डॉ. वर्षा पाटील, संचालिका डॉ. केतकी पाटील, डॉ. अनिकेत पाटील, कार्डिओलॉजिस्ट डॉ. वैभव पाटील, आणि एमबीए कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करण्यात आले. या प्रसंगी अनिल खर्चे, अलका खर्चे, भुसावळ शाळेच्या प्राचार्या अनघा पाटील, सावदा शाळेच्या प्राचार्या भारती महाजन, कु. कृतिका यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
शाळेच्या प्राचार्या निलीमा चौधरी यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले. सुप्रीम इंडस्ट्रीचे महाप्रबंधक ज्ञानदेव महाडिक यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन करताना, "हे माझे मोठे सन्मान आहे. मी खूप भारावून गेलो. मला इथे निमंत्रित केल्याबद्दल गोदावरी स्कूलचे आभार," असे सांगितले. तसेच, "ध्येय निश्चित केल्यास आकाशही ठेंगणे होते," असे प्रेरणादायक शब्द महाडिक यांनी व्यक्त केले.
डॉ. अनिकेत पाटील यांनी गोदावरी शाळेच्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाबद्दल सांगितले आणि शाळेतील प्रत्येक शिक्षकाच्या समर्पणाचे कौतुक केले. दुसऱ्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. विजय माहेश्वरी, पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, गोदावरी फाउंडेशनचे सदस्य डॉ. अनिकेत पाटील, गोदावरी एमबीए कॉलेजचे प्राचार्य डॉ. प्रशांत वारके, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजय पाटील यांच्या उपस्थितीत झाले.
कार्यक्रमात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना २०२२-२३ आणि २०२३-२४ च्या वर्षात उच्चांक प्राप्त केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराला पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात जोरदार दाद दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या प्राचार्य सौ. निलीमा चौधरी यांनी शाळेच्या वार्षिक अहवालाची सादरीकरण केले आणि कार्यक्रम राष्ट्रगीताने समाप्त झाला. शाळेच्या व्यवस्थापनाने 'एलिगंझा' कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिलेल्या सर्व शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांचे आभार मानले.
'एलिगंझा २०२४' हा गोदावरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या वार्षिक उपक्रमांतील एक महत्त्वाचा क्षण ठरला, ज्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक प्रगतीचे दर्शन घडले.
टिप्पणी पोस्ट करा